“हातांनी अनुभवला जंजिरा… किल्ल्यानेही जाणवला तो स्पर्श!”

जिजाऊ प्रतिष्ठान आणि NAB यांच्या उपक्रमातून दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी इतिहास हातांनी ‘पाहिला’ आणि मनाने अनुभवला.

“हातांनी अनुभवला जंजिरा… किल्ल्यानेही जाणवला तो स्पर्श!”

जिजाऊ प्रतिष्ठान आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (NAB) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “दुर्गदर्शन मोहिमे”त यंदा दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी मुरुडच्या अजिंक्य जंजिरा किल्ल्याचा स्पर्श अनुभव घेतला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी इतिहास ‘पाहिला’ त्यांच्या मनाच्या आणि हातांच्या डोळ्यांनी!

सालाबादप्रमाणे सलग १४ व्या वर्षी आयोजित या उपक्रमात यापूर्वी १३ गिरीदुर्ग जिंकले गेले होते. मात्र, यंदा जलदुर्ग जंजिरा किल्ला निवडला गेला. दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी ही मोहीम पार पडली. नॅबचे २९ विद्यार्थी आणि ४ शिक्षिका यांनी सहभाग घेतला. जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. चंद्रकांत साटम यांच्या नेतृत्वाखाली २९ स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांची काळजी घेत, ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शुक्रवारी रात्री मुंबईहून प्रस्थान करून शनिवारी सकाळी एकदरा येथील “सम्राट हॉटेल”मध्ये सर्व मंडळी जमली. चहा-नाश्त्यानंतर हा चमू जंजिराकडे रवाना झाला. केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. बी.जी. येलीकर आणि श्री. प्रकाश घुगरे यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य दिले.

जंजिऱ्याच्या लाटांवर हेलकावे घेत बोटीने किल्ल्यापर्यंत पोहोचणे, आणि त्या बोटीवरून महादरवाज्याजवळ उतरवणे — हे आव्हान होते, पण स्वयंसेवकांनी ते समर्थपणे पेलले. विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी महादरवाज्यावरील लोखंडी कडी, टोकदार खिळे, विशाल तोफा, भक्कम तटबंदी अशा दुर्गरचनांचा “स्पर्श” करून इतिहास अनुभवला.

प्रा. डॉ. मृण्मयी साटम यांनी किल्ल्याच्या इतिहासाचे दस्तऐवज आणि रोचक किस्स्यांसह विद्यार्थ्यांना श्रवणीय माहिती दिली. या मुलांनी स्वयंसेवकांच्या मदतीने किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली, आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत जंजिऱ्याचा निरोप घेतला.

परतीच्या प्रवासात लाटांचा आवाज, वाऱ्याची झुळूक आणि मनात घर केलेले अनुभव — या सगळ्याने विद्यार्थ्यांच्या मनात अविस्मरणीय आठवणी कोरल्या. दंडराजपूरी किनाऱ्यावर उतरल्यावर “सम्राट हॉटेल”मधील सुग्रास भोजनाचा सर्वांनी आनंद घेतला.

विद्यार्थ्यांनी आनंदाने सांगितले —

“खूप चांगला अनुभव मिळाला. स्वयंसेवकांनी उत्तम काळजी घेतली. इतिहास श्रवणीय होता. होडीचा प्रवास थोडा भीतीदायक पण अतिशय आनंददायी होता.”

शेवटी श्री. चंद्रकांत साटम यांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानून मोहिमेचा समारोप केला.

जंजिऱ्याच्या दगडी भिंतींनी या विद्यार्थ्यांचा “स्पर्श” अनुभवला — आणि किल्ल्याच्या इतिहासात आज एक भावनिक अध्याय लिहिला गेला.

Exit mobile version