वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ (डब्ल्यूसीएल) स्पर्धेतील भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवारी (२० जुलै) खेळवला जाणार होता. मात्र भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या निर्णयावर भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंह यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत एकीचं प्रतिक दर्शवलं.
या सामन्यापूर्वीच भारताचे शिखर धवन, हरभजन सिंह, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास नकार देत होते.
डब्ल्यूसीएलने अधिकृत निवेदनात म्हटलं की, “आम्हाला माहिती मिळाली की पाकिस्तानची हॉकी टीम भारतात येणार आहे आणि दोन्ही देशांदरम्यान व्हॉलीबॉलसह काही स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यामुळे आम्ही एक सकारात्मक उदाहरण निर्माण व्हावं या हेतूने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनवधानाने आम्ही काहींच्या भावना दुखावल्या असाव्यात.”
हरभजन सिंह म्हणाले, “आम्ही आमच्या देशासोबत आणि लोकांसोबत आहोत. सरकारच्या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो. एकीचं हे प्रदर्शन आवश्यक होतं आणि आम्ही ते केलं.”
डब्ल्यूसीएलने नमूद केलं की, “भारतीय दिग्गज क्रिकेटर्सना आम्ही अनावधानाने अस्वस्थ केलं. त्यामुळे आम्ही हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पाहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचे बळी गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. ७ ते १० मे दरम्यान भारत-पाकिस्तान दरम्यान लष्करी संघर्षही झाला.







