निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. योग ही जीवनपद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात. सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
दिल्ली हायकोर्टाकडून केजरीवालांच्या सुटकेला स्थगिती!
योग साधनेमुळे समाजात सकारात्मक बदल!
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा!
‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योगचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योग जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे काम योग करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी अर्धा तास चालेल्या योग सत्रात मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधान सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







