ऑस्ट्रेलियाच्या ब्यू वेबस्टरने लॉर्ड्सवर खेळलेल्या संयमी आणि महत्त्वपूर्ण ७२ धावांच्या खेळीचं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पोंटिंग यांनी खास कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये वेबस्टरने ही खेळी करत आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या, ज्यात सर्वाधिक योगदान वेबस्टरचं होतं. त्याने ९२ चेंडूत ७२ धावा करत आफ्रिकन गोलंदाजांविरोधात छान प्रतिकार केला. या वर्षी भारताविरुद्ध सिडनी येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या वेबस्टरसाठी ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.
पोंटिंग यांनी आयसीसी डिजिटलशी बोलताना सांगितलं की,
“जर वेबस्टरचे ७२ धावा वजा केल्या, तर स्कोअरकार्ड पूर्णपणे वेगळं दिसलं असतं. यावरूनच दिसून येतं की, तो सध्या आपल्या खेळात किती सहज आहे.”
पुढे ते म्हणाले,
“जेव्हा संघ अडचणीत होता, तेव्हा वेबस्टरने मैदानात उतरून आपल्या नैसर्गिक शैलीने खेळ सुरू ठेवला. त्याने आफ्रिकन गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आक्रमक राहिला.”
वेबस्टरशिवाय, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही ६६ धावा करत महत्वाची साथ दिली. तर यष्टीरक्षक अॅलेक्स केरीने २३ धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये कगिसो रबाडा यांनी सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्यांनी ५१ धावांत ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाला झटपट बाद केलं. मात्र, वेबस्टरच्या खेळीमुळे संघ २०० पार गेला.
पोंटिंग म्हणाले,
“पिच गोलंदाजांसाठी अनुकूल होती. जूनमध्ये ब्रिटनमध्ये ड्यूक्स चेंडूने नेहमीच स्विंग मिळते. पण जर फलंदाज स्मिथ आणि वेबस्टरप्रमाणे खेळावर स्थिरावले, तर मोठी धावसंख्या उभारणं शक्य आहे.”
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी देखील सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस वर्चस्व गाजवलं. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी शानदार गोलंदाजी करत आफ्रिकेचा डाव कोसळवला आणि दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दक्षिण आफ्रिका ४३/४ या संकटात होती.







