चीनने आपले दुतावास व राजनैतिक संबंध वापरून दासॉल्ट एव्हिएशनच्या राफेल लढाऊ विमानांची जागतिक प्रतिमा व विक्री खाली आणण्यासाठी एक सर्वसमावेशक मोहीम राबवली होती, हा गौप्यस्फोट फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. हा प्रकार भारताने मे २०२५ मध्ये केलेल्या हाय-प्रोफाइल ऑपरेशन सिंदूरनंतर उघड झाला आहे.
फ्रान्सच्या राफेल या प्रमुख लढाऊ विमानाचा सध्या चुकीचा प्रचार काही स्तरातून सुरू आहे. मुख्यतः चीनच्या राजनैतिक प्रयत्नांतून आणि पाकिस्तानने रचलेल्या कहाण्यांमधून हा प्रचार सुरू असल्याचे दिसते आहे.
फ्रेंच गुप्तचर अहवालानुसार, जगभरातील चीनच्या दुतावासांमध्ये तैनात संरक्षण अधिकाऱ्यांनी राफेल विक्री रोखण्यासाठी एक उद्दिष्ट ठरवून प्रयत्न केले. विशेषतः आशिया व आफ्रिकेतील देशांनी फ्रान्सचे हे विमान विकत घेऊ नये किंवा आधीच्या ऑर्डर रद्द कराव्यात असा दबाव टाकला जात होता. यात खालील गोष्टींचा समावेश होता, छेडछाड केलेली चित्रे, एआय-जनरेटेड व्हिडिओ, व व्हिडिओ-गेम फुटेज पसरवणे, ज्यात राफेल विमान पाडल्याचे दाखवले जात होते. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान राफेलच्या युद्धक्षमता बाबत शंका निर्माण करणारे सोशल मीडिया ऑपरेशन्स. संभाव्य ग्राहक देशांवर थेट राजनयिक दबाव, जिथे चिनी पर्यायांना “उत्कृष्ट” म्हणून प्रचार केला जात होता.
ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी कथा
फ्रेंच गुप्तचर सूत्रांनी असेही सांगितले की, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर राफेलच्या कामगिरीबद्दल चुकीचे दावे पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या दिवसांत पाकिस्तानी मीडिया व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी असे सांगू लागले की, भारतीय वायुदलाचे दोन राफेल विमाने या कारवाईत पाडली गेली आहेत, तरी याचे कोणतेही दृश्य पुरावे, अधिकृत कबुली किंवा उपग्रह चित्रे उपलब्ध नव्हती.
हे ही वाचा:
कंगना रणौत भडकल्या काँग्रेस नेत्यांवर !
मक्याचे उत्पादन दुप्पट करण्याचे भारताचे लक्ष्य
ब्रिक्स देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
या दाव्यांना भारतीय अधिकाऱ्यांनी व दासॉल्ट एव्हिएशनने दोघांनीही जोरदार नाकारले आहे. पाकच्या दाव्यांना कुठलाही स्वतंत्र पुरावा नाही. भारतीय संरक्षण स्रोतांनी याला “बिनबुडाचा प्रचार” असे म्हटले आहे.
एअर मार्शल ए.के. भारती यांनी ऑपरेशननंतर राफेल नुकसानाबद्दल काहीही पुष्टी केली नाही, तर दासॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी हे दावे “अचूक नसल्याचे” सांगत राफेलच्या विश्वासार्हतेवर ठाम विश्वास दर्शवला. भारत व फ्रान्समधील संरक्षण विश्लेषकांनीही पाकच्या दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चीन-पाकिस्तानचे संयुक्त धोरण?
फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानकडून या खोट्या कथा पसरवण्यामागे चीनच्या व्यापक प्रचार मोहिमेचा एक भाग असण्याची शक्यता आहे. या मोहिमेची वेळ व पद्धत पाहता, हे दोन देशांनी मिळून आशियातील संरक्षण बाजारपेठेतील फ्रान्सचा प्रभाव कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न दिसतो.
फ्रान्सची प्रतिक्रिया
पॅरिसने या दिशाभूल मोहीमेचा तीव्र विरोध करत राफेलच्या सिद्ध युद्ध कामगिरीवर ठाम विश्वास दर्शवला आहे. फ्रेंच प्रशासनाच्या मते, ही मोहीम त्यांच्या संरक्षण उद्योगाला आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेसाठी फ्रान्सच्या भूमिकेला थेट आव्हान आहे. चीनने मात्र हे आरोप “आधारहीन अफवा व बदनामी” असे म्हणत फेटाळले आहेत.







