तिबेटचे धर्मगुरू, बौद्ध धर्मीयांमध्ये अत्यंत वंदनीय नेते दलाई लामा तेन्झिन गात्सो यांचा काल ६ जुलै रोजी ९० वा वाढदिवस होता. चीनने तिबेट गिळल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे कार्यरत असलेल्या तिबेट मध्यवर्ती प्रशासनाचे अर्थात तिबेट सरकारचे ते प्रमुख आहेत. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचे अभिष्ट चिंतन केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द उतरणीला लागल्यानंतरही काँग्रेसची त्यांच्यावर असलेली निष्ठा पातळ झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यात निष्ठेला स्मरून दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. डॉ. मनमोहन सिंह देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी एकदाही दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या.
चीनचे मिंधे कोण? चीनला कोण घाबरतो ? चीनचे हितसंबंध कोण जपतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मिळाली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे मे महिन्यापासून गायब आहेत. त्यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. ते आता फार राष्ट्राध्यक्ष पदी राहणार नाहीत, इथपासून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यात आले आहे, इथपर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. चीनमध्ये जिनपिंग यांचे मे पासून जाहीर कार्यक्रमात सुद्धा दर्शन होत नाही. ग्लोबल टाईम्समध्ये त्यांचे फोटो येईनासे झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आदी दहा देशांचा समुह असलेल्या ब्रिक्सच्या बैठकीत जिनपिंग यांची अनुपस्थिती या चर्चांना बळ देणारी ठरली आहे.
ब्रिक्सची बैठक यंदा ब्राझिलमध्ये आहे. जिनपिंग गेल्या १२ वर्षात झालेल्या ११ बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान लि कियांग यांनी बैठकीत सहभाग घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ युद्धामुळे ब्रिक्सची ही बैठक महत्वपूर्ण झाली होती. तरीही जिनपिंग तिथे फिरकले नाहीत. ते कुठे आहेत, नाहीत कुणालाच पत्ता नाही. या घडामोडींच्या दरम्यान चीनने लॉटरी पद्धतीने दलाई लामा यांचा वारस शोधण्याची टूम काढली आहे. म्हणजे मुलं एकत्र करायची चिठ्ठ्या उचलायला सांगायच्या आणि एक विशिष्ठ चिठ्ठी ज्याच्या हाती आली तो भावी दलाई लामा असे घोषित करायचे असा चीनचा डाव आहे. पुढचा दलाई लामा आपलाच असावा या दिशेने चीनची धडपड आहे.
दमाई लामांचा वारस नेमण्याची एक ठराविक तिबेटीअन परंपरा आहे. हा दलाई लामा आधीच्या एखाद्या दमाई लामांचा पुनर्जन्म असतो. त्याच्यामध्ये काही विशिष्ठ लक्षणे असतात. भावी दलाई लामा जाहीर कऱण्याची शेकडो वर्षांपासूनची एक निश्चित प्रक्रिया आहे. त्याच्या आधारावर त्याला दलाई लामा म्हणून जाहीर करण्यात येते. सध्याचे दलाई लामा हे १४ वे दलाई लामा आहेत. त्यांनी नवा दलाई लामाची नियुक्ती करण्याच्या चीनी खेळीला हाणून पाडले आहे. चीनी सरकार दलाई लामांची नियुक्ती करू शकत नाही. नव्या दलाई लामांची नियुक्ती करण्याचा अधिकार गॅडन फोड्रँग ट्रस्टचा आहे. या ट्रस्टची स्थापना दलाई लामा यांनीच केलेली आहे. त्यामुळे दलाई लामांवर चीनचा प्रचंड तिळपापड झालेला आहे.
हे ही वाचा:
राफेलबद्दलच्या खोट्या प्रचाराचे मूळ चीनमध्ये
‘सेतु बंध सर्वांगासन’, जाणून घ्या योग्य पद्धत
भारतात वाहन विक्रीत बघा किती टक्क्यांची वाढ
नव्या नियमांची नव्हे, प्रभावी अंमलबजावणी गरज
जो पर्यंत तिबेटींचे श्रद्धास्थान असलेल्या दलाई लामांचा ताबा आपल्याकडे नाही, तोपर्यंत तिबेटवर आपला कब्जा पूर्ण होत नाही, हे चीनला ठाऊक आहे. सध्याचे दलाई लामा भारताच्या भूमीत तिबेंटींचे सरकार चालवतायत. ते आपल्या कह्यात नाहीत, हे चीनला ठाऊक आहे. त्यामुळे किमान पुढचा दलाई लामा तरी आपल्या तालावर नाचणारा असावा यासाठी चीनच्या खटपटी लटपटी सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेकांनी काल दलाई लामांचे अभिष्टचिंतन केले. धर्मशालामध्ये झालेल्या सोबळ्यात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. परंतु काँग्रेसच्या एकाही प्रमुख नेत्याने दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. इतकी काँग्रेसची चीनमुळे तंतरते. त्यांना चीनची नाराजी ओढवून घ्यायची नाही.
हे फार आश्चर्यकारक नाही. कारण ही काँग्रेसची परंपरा आहे. यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात डॉ.मनमोहन सिंह यांनी एकदाही दलाई लामा यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कधीही त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यूपीए सरकार गेल्यानंतर २०१६ मध्ये डॉ.मनमोहन सिंह यांनी दलाई लामांना शुभेच्छा दिल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. दलाई लामांपासून अंतर ठेवून राहाणे ही यूपीएची भूमिका होती. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आजही ही परंपरा कायम ठेवली आहे.
यूपीए सरकारच्या काळात चीनचे भारतावर डोळे वटारणे सतत सुरू असायचे. त्या वटारलेल्या डोळ्यात डोळे घालून पाहाण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती. चीनची नाराजी ओढवू नये म्हणून यूपीए सरकारच्या काळात भारताने सीमावर्ती भागात रस्ते, पूलांचे जाळे निर्माण करणे टाळले. दौलत बेग ओल्डी सारखी लडाखमधील महत्वाची धावपट्टी कायम पडीक ठेवली. चीनी सामानाला भारताची बाजारपेठ इतकी मुक्तपणे उपलब्ध केली की आपले कुटीर उद्योग साफ झोपले. सरकार बदलल्यावर काय होते, लक्षात घ्या. एकेकाळी चीनच्या खेळण्यांनी आपली बाजारपेठ ओसंडून वाहात होती. आज आपण खेळण्याचे निर्यातदार बनलेलो आहोत. जगातील १५३ देशांना १५२.३४ दशलक्ष डॉलर्सची खेळणी भारत निर्यात करतो. भारत दरवर्षी ४०० दशलक्ष खेळण्याची निर्मिती करतो. वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वीच ही माहिती जाहीर केलेली आहे. एकेकाळी चीनमध्ये निर्मिती होणारे आय़फोन आज भारतात तयार होतायत. जगातील प्रत्येक पाचापैकी दोन आय़फोन भारतात बनतायत. हे ज्यांना झेपले नाही ते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी म्हणत होते, चीन ड्रोन निर्मितीत खूप पुढे आहे. मोदी सरकारने या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी काहीही केले नाही.
यूपीएच्या काळातही हे शक्य होते. परंतु ते कधीही घडले नाही. त्याचे कारण बहुधा २००८ मध्ये चीनी कम्युनिस्ट पार्टीसोबत काँग्रेसने केलेला करार असावा. त्या कराराचे जे बहुचर्चित छायाचित्र आहे, त्यात शी राहुल, सोनिया यांच्यासोबत शी जिनपिंग सुद्धा दिसतायत. बहुधा देश गहाण ठेवण्याच्या अटीवर राहुल गांधी यांनी शिक्कामोर्तब केले असावे. यूपीएच्या कार्यकाळ संपल्यानंतरही राहुल गांधी यांचे चीनशी असलेले इमान कायम राहीले. डोकलाम संघर्षाच्या काळात त्यांनी गुपचूप चीनी राजदूताची भेट घेऊन पुन्हा एकदा त्या निष्ठेचे प्रदर्शन केले. दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळून याच निष्ठेचे प्रदर्शन काँग्रेस नेते करत होते.
जवाहरलाल नेहरु यांच्या काळात चीनने तिबेट गिळला. भारत आणि चीनमध्ये असलेला एक स्वतंत्र देश ताब्यात घेतल्यामुळे चीनची सीमा थेट भारताला भिडली. १९६२ मध्ये आपली ३५ हजार किलोमीटर चौरस मैल जमीन चीनने घशात घातली. हे सगळे सविस्तर सांगण्याचे कारण असे की हेच काँग्रेसवाले अलिकडे मोदी चीनला घाबरतात, अशी विधाने वारंवार करतात. त्यांची चीनबाबत धास्ती किती होती हे उघड करण्यासाठी दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा इतिहास सांगितला. चीन आणि भारताचा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतावर अचूक मारा कऱण्यासाठी चीन आपल्या उपग्रहांचा वापर करत होता. चीनने या युद्धात पाकिस्तानला सर्वतोपरी मदत केली, असा खुलासा भारतीय लष्कराचे एक वरीष्ठ सेनापती राहुल पी.सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला आहे. अशा काळात या चीन प्रेमींवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. जिनपिंग राहतील किंवा जातील, परंतु काँग्रेसचे चीन प्रेम सरणार नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







