हॉटेल चालक आणि एका कथित ‘डेटिंग ऍप’च्या संगनमताने पुरुषांना जाळ्यात ओढून लूटमार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी बोरिवलीतील एमएचबी पोलिसांनी २२ जणांच्या टोळीला अटक केली असून त्यात ६ तरुणींचा समावेश आहे.
अंधेरी येथील कर्ज वसुली फर्ममध्ये काम करणाऱ्या २६ वर्षीय तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, तो दिशा शर्मा नावाच्या महिलेशी डेटिंग ऍपवर जोडला गेला आणि बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत डेटवर गेला. जेवणानंतर, वेटरने त्यांनी ऑर्डर केलेल्या जेवणाचे आणि हुक्क्याचे ३५,००० रुपयांचे बिल सादर केले ,बिलात इतकी मोठी रक्कम बघून तक्रारदार आश्चर्यचकित झाला आणि त्याने पोलिसांना फोन करून गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला.
त्यानंतर बिल कमी करून ३०,००० करण्यात आले, त्यानंतर शर्मा यांनी हस्तक्षेप केला आणि बिलाचे विभाजन करून अर्धी रक्कम देण्याची ऑफर दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, वेटरने शेअर केलेला QR कोड तक्रारदाराने स्कॅन केला आणि १५,००० भरले. घरी पोहोचल्यानंतर त्याला लक्षात आले की, त्याने हॉटेलला नाही तर मोहम्मद तालिब नावाच्या व्यक्तीला पैसे दिले आहेत. त्याला गैरप्रकाराचा संशय आला आणि त्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा:
संजोग गुप्ता ‘आयसीसी’चे नवे सीईओ
धर्मांतर, लोकसंख्यात्मक बदलांविरोधात जागृती आवश्यक
ऑपरेशन ब्लू स्टार : इंदिरा गांधींना ब्रिटनने दिला होता पाठिंबा
तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, शर्माने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तक्रारदाराची फसवणूक केली. पोलिसांनी शर्माचा मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि नवी मुंबईतील दिघा भागातील एका हॉटेलमध्ये तिचे ठिकाण शोधले. पोलिसांनी गुरुवारी हॉटेलवर छापा टाकला आणि तिला अटक केली. तिच्या चौकशी केली असता पोलिसांना कळले की हे एक मोठे रॅकेट आहे. ही रॅकेटमधील महिला वेगवेगळ्या डेटिंग ऍप्सवर पुरुषांना फसवत, त्यांना डेटवर घेऊन जात, जास्त रकमेचे बनावट बिल सादर करत आणि हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची फसवणूक करत. पुढील काही दिवसांत पोलिसांनी ६ महिला आणि १६ पुरुषांसह २२ जणांना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, टोळीतील सदस्य दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील आहेत आणि ते लोकांची फसवणूक करण्यासाठी मुंबईत आले होते.टोळीतील महिला विविध महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून डेटिंग ऍप्सवर पुरुषांशी मैत्री करत होत्या. या आयडी वापरून त्या तरुणांना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बोलावत असत , जेवण देत असत आणि बनावट बिले सादर करून त्यांची फसवणूक करत असत,” असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.







