30 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाव्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा

व्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा

Google News Follow

Related

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीच्या राजकारणाला बळ देण्याचा थेट आरोप केला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबाबतचा द्वेष वाढला’, असे सडेतोड वक्तव्य राज यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यात दम आहे. ते जे बोलले ते बोलण्याचे धाडस महाराष्ट्रातला मीडिया गेल्या २० वर्षांच्या काळात करू शकलेला नाही. पुढेही करेल अशी शक्यता नाही.

महाराष्ट्रातील जातीय तेढ वाढवण्यात पवारांचे योगदान मोठे आहे. पुरोगामीत्वाच्या बुरख्याखाली त्यांनी ते वर्षोनुवर्षे सुरू ठेवले. त्यावर कधी तरी उघड चर्चा होण्याची गरज होती. राज ठाकरे यांनी त्या चर्चेला तोंड फोडलंय त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. काँग्रेसशी फारकत घेऊन पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला घातला. त्यानंतर काही काळात महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड नामक संघटनेने जोर धरला. या संघटनेने एक नवे ‘तत्वज्ञान’ आणि एक नवा ‘इतिहास’ जन्माला घातला. छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हेत. त्यांचा लढा मुस्लीमांविरुद्ध नव्हता. महाराजांचे ३३ टक्के अंगरक्षक मुस्लीम होते. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलेले असले, तरी त्यांचे मृत्यूसमयी केलेले अमानुष हाल हे मनुवाद्यांनी केल्याची शक्यता आहे. असे पिवळे तर्कट मांडून ब्रिगेडी इतिहासकारांनी ब्राह्मणांशी उभा दावा मांडला. पुण्याचे नाव जिजापूर करण्याची मागणी करणाऱ्या या नव इतिहासकारांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याचे ऐकीवात नाही. अफजलखान, शाहीस्ताखान, आदीलशहा, औरंगजेब या शिवकालीन खलनायकांच्या जागी ब्रिगेडी इतिहासकारांनी राम गणेश गडकरी, दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य करायला सुरूवात केली. मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद पेटवण्याची सुरूवात केली. पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा फोडण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या आदरणीय वयोवृद्धावर शाई फेकण्याचे प्रताप करण्यात आले. सदासर्वदा लोकशाही, पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणाऱ्या शरद पवार यांनी या घटनांना निषेध केल्याचे ऐकीवात नाही. उलट या ब्रिगेडी तत्वज्ञानाला बळ देणारी देणारी वक्तव्य करून या प्रचाराला खतपाणी घालण्याचे काम केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात ब्राह्मण विरोध अधिक प्रखर झाला. पवारांनी अनेकदा या भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यांच्या वक्तव्यातील ब्राह्मणविरोधी विखार लक्षात यावा इतका ठळक होता. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना, ‘पक्षाच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीचा वापर करावा’, असे आवाहन केले. हे वक्तव्य एकांडे किंवा अपवादात्मक नव्हते. अशा वक्तव्यांची जंत्री आहे.
‘छत्रपती शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते’. ‘समर्थ रामदास छत्रपतींचे गुरू नव्हते’, अशी अनेक वक्तव्य पवारांनी केली.

भाजपाने छत्रपती संभाजी यांची राज्यसभेवर पाठवणी केल्यानंतर पवारांना पोटशूळ उठला. ‘पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती केली नव्हती’, असा विखारी टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. पवारांच्या वक्तव्याचा वरकरणी भाव कधी पुरोगामी, कधी फडणवीसांना टोला असा असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यात ब्राह्मण विरोधाचा विखार हा प्रमुख घटक होता. महाराष्ट्रात एक ब्राह्मण मुख्यमंत्री पदावर बसलाय आणि तो आपल्या सगळ्या डावपेचांना पुरून उरतोय, याची सल पवारांच्या या वक्तव्यातून व्यक्त होत होती.महाराष्ट्रातील एकाही वर्तमानपत्राला, चॅनलला या मुद्यावरून पुरोगामी शरद पवारांची उलटतपासणी करण्याची इच्छा झाली नाही. परंतु जनतेला मात्र पवारांचा भाव कळत होता.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

राज ठाकरे यांनी याच मुद्यावरून शरद पवारांवर थेट शरसंधान केले आहे. राज ठाकरे यांचे वक्तव्य हे राज्यात निर्माण होऊ घातलेल्या राजकीय समीकरणाला बळकट करण्यासाठी केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तरीही त्याचे महत्व कमी होत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल असलेला त्यांचा आदर आणि जातीच्या राजकारणाला विरोध मात्र नि:संशय प्रामाणिक आहे. जातीचे राजकारण शिवसेनाप्रमुखांनी कधी केले नाही. राज ठाकरेंनाही ते मान्य नाही. त्यामुळे पवारांच्या विरोधात त्यांनी ज्या मुद्यावरून तोफ डागली त्यावर चर्चा होण्याची गरज आहे.राज ठाकरेंचे वक्तव्य पवारांना झोंबले असावे, म्हणून त्यांनी प्रत्युत्तरादाखल राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेचे विचार वाचण्याचा सल्ला दिला. पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला नाही, याचे कारण स्पष्ट होते. कारण शिवसेना-भाजपा युतीला महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यानतंर शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले. शिवसेनाप्रमुख प्रबोधनकारांच्या विचारांचे सच्चे वारसदार होते. म्हणून त्यांनी मनोहर जोशींची जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहीले. राज ठाकरे यांनी त्याच भाषेत पवारांना उत्तर दिले आहे, ‘आपण बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर आहेत म्हणून त्यांच्याकडे जातो ब्राह्मण आहेत म्हणून नाही.’

महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांनी जात व्यवस्थेच्या विरोधात प्रखर संघर्ष केला. परंतु त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी सतत जातीच्या भिंती बळकट करून सत्तेची सूत्र ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार अशा राजकारण्यांचे अग्रणी आहेत. त्यांनी आय़ुष्यभर जातीचे राजकारण केले. भाजपा नेते गोपिनाथ मुंडे २००९ मध्ये लोकसभेच्या रींगणात उतरले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने ‘वाजवा तुतारी, हटवा बंजारी’ अशी घोषणा दिली होती. आश्चर्य वाटेल, पण संभाजी ब्रिगेडने नाशिकमध्ये छगन भुजबळांविरोधात ‘वाजवा टाळी, हटवा माळी’, ही घोषणा दिली होती. पवारांचे पुरोगामी राजकारण हे असे आहे. याच राजकारणामुळे ते देशाचे सोडा, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नेतेही होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची संख्या कधी दोन आकडी होऊ शकली नाही. ज्या जातीच्या राजकारणाचा वापर त्यांनी मराहाष्ट्रातील अनेक नेत्यांच्याविरोधात केला, त्या जातीच्या राजकारणाने त्यांची मुळातच कमकुवत असलेली विश्वासार्हता साफ संपुष्टात आणली.

पवारांवर केलेल्या आरोपानंतर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमकींना सुरूवात झाली आहे. मनसेचे नेते ब्रिगेडविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे हे आक्रमक नेते असले तरी त्यांच्यावर सतत भूमिका बदलण्याचा ठपका आहे. पवारांच्या जातीच्या राजकारणाविरोधात त्यांनी घेतलेली भूमिका ही धाडसाची आणि महाराष्ट्राच्या हिताची आहे. या भूमिकेवर ते ठाम राहतील अशी जातवादी राजकारणाच्या विरोधात असलेल्या मराठी जनांची अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,849चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा