वडोदरा जिल्ह्यात पुल कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. या दु:खद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अपघातात जिव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “ही दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. मी त्या सर्व कुटुंबांसोबत संवेदना व्यक्त करतो ज्यांनी आपल्या प्रियजनांना या दुर्घटनेत गमावले आहे.”
पंतप्रधानांनी जखमी झालेल्या नागरिकांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की सरकार या कठीण काळात प्रभावित नागरिकांसोबत आहे व त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले की पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधी (PMNRF) मधून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये, तर जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही दुर्घटना बुधवारी सकाळी सुमारे ७ ते ७:३० च्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांच्या मते, पुल कोसळल्यानंतर ३ ट्रक, २ इको कार, १ रिक्षा, १ पिकअप आणि २ दुचाकी थेट नदीत कोसळल्या.
हेही वाचा..
राहुल गांधी पिकनिकसाठी आले आणि निघून गेले
तेजस्वी यादव यांच्या दाव्यांची पोलखोल
तिरुमला देवस्थानचा कर्मचारी लपूनछपून जात होता चर्चमध्ये!
दिल्लीत पाच घुसखोर बांगलादेशींना अटक!
या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर पादरा सीएचसी आणि वडोदरा एसएसजी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येची अधिकृत पुष्टी जिल्हाधिकारी अनिल धमेलिया यांनी केली आहे. या घटनेनंतर २० हून अधिक अग्निशमन कर्मचारी, १ एनडीआरएफ आणि १ एसडीआरएफ टीम, २ अग्निशमन बोटी, ३ फायर ब्रिगेड गाड्या, १० हून अधिक रुग्णवाहिका आणि ५ पेक्षा जास्त वैद्यकीय पथके मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहेत.
तसेच, स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात आपली भूमिका बजावली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार चैतन्यसिंह झाला, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.







