फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) ने बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्राझील दौरा हा भारत-ब्राझील भागीदारीला व्यापार, वाणिज्य आणि धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एफआयईओचे अध्यक्ष एस.सी. रल्हन यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी आपापसातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची आणि द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीच्या अपार, पण अद्याप न वापरलेल्या संधींचा उपयोग करण्याची कटिबद्धता व्यक्त केली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांनी कृषी व कृषी तंत्रज्ञान, जैव इंधन, नवीकरणीय ऊर्जा, तेल व गॅस, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, अवकाश संशोधन व संरक्षण उत्पादन यासारख्या पूरक क्षेत्रांमध्ये व्यापार विविधीकरण व विस्तारावर भर दिला आहे. एफआयईओ अध्यक्षांनी पुढे सांगितले की, भारत आणि ब्राझीलने व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक सहकार्यासाठी एक मंत्रिस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा प्रगतीवर सतत लक्ष ठेवेल, नव्या उपक्रमांना गती देईल आणि व्यापारासंबंधी समस्यांचे सक्रियपणे निराकरण करण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करेल. या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये संस्थात्मक भागीदारी, धोरण समन्वय आणि व्यापार संवाद अधिक सुलभ होईल.
हेही वाचा..
हिंदू असल्याचे भासवून तो मैत्रिणीला हनुमान चालिसा म्हणून दाखवायचा, पण…
राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले!
राजस्थानमधील कन्हैय्यालाल हत्याप्रकरणावरील ‘उदयपूर फाइल्स’ला स्थगितीस नकार
मॉलमध्ये काम करायचे असेल तर मुस्लिम हो, म्हणणाऱ्या फराझला अटक
ते म्हणाले की, एफआयईओ या घटनाक्रमाकडे व्यापारातील पारदर्शकता, समन्वय आणि पूर्वानुमान वर्तवण्याच्या दृष्टीने तसेच लॅटिन अमेरिकन देशांमध्ये भारतीय निर्यातदार व गुंतवणूकदारांसमोरील अडचणी सोडवण्याच्या दिशेने एक योग्य आणि आवश्यक पाऊल म्हणून पाहते. एफआयईओने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, भारतीय व्यावसायिक समुदायाने या दौर्यातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा आणि ब्राझीलमध्ये दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. ब्राझीलचा गतिशील बाजार, नवोन्मेषासाठी अनुकूल वातावरण आणि भारतीय उत्पादन व तंत्रज्ञानाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी भारतासाठी प्रचंड विस्ताराच्या शक्यता निर्माण करतात.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, “एफआयईओ या दौर्याचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि ब्राझीलच्या बाजारात भारतीय निर्यातदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी दोन्ही सरकारे आणि संबंधित व्यापार संघटनांसोबत एकत्र काम करण्यास पूर्णतः तयार आहे.”







