त्याग आणि तपस्या: भगवा रंग त्याग आणि वैराग्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. आपले ऋषी, मुनी आध्यात्मिक साधनेचे आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून याच रंगाची वस्त्रे परिधान करतात.
रामायण आणि महाभारत: हीच ध्वजाची परंपरा रामायण आणि महाभारत काळातही दिसून येते. प्रभू श्री राम, भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांवरही भगवाच ध्वज होता. अर्जुनाच्या रथावरील ‘कपिध्वज’ हे याचेच उदाहरण आहे, ज्यावर स्वतः हनुमान विराजमान होते.
ऐतिहासिक वारसा
मध्ययुगात जेव्हा परकीय आक्रमकांनी भारताची संस्कृती आणि अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच भगव्या ध्वजाने पुन्हा एकदा राष्ट्ररक्षणाची प्रेरणा दिली. देवगिरीचे यादव आणि दक्षिणेकडील विजयानगरचे महान हिंदू साम्राज्य यांचे ध्वज भगवेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भगव्या ध्वजाला ‘हिंदवी स्वराज्या’चा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारले आणि मरणासन्न झालेल्या हिंदुत्वाला पुन्हा जागृत केले. हा ध्वज केवळ हिंदूंच्या सत्तेचे प्रतीक नव्हता, तर तो अन्याय आणि अधर्माविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक होता. गुरू गोविंद सिंह आणि महाराजा रणजीत सिंह यांच्या शीख साम्राज्यानेही याच ध्वजाखाली काबूल-कंधारपर्यंत विजय मिळवला. हा ध्वज हजारो वर्षांपासून आपल्या त्याग, शौर्य आणि संस्कृतीचा प्रेरणास्रोत राहिला आहे.
भगवा ध्वजच गुरू का? डॉ. हेडगेवारांचे चिंतन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाल्यानंतर संघाचा गुरू कोण असावा? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. अनेक स्वयंसेवकांची इच्छा होती की संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच गुरू स्थान स्वीकारावे. मात्र डॉक्टरांनी आपल्या दूरदृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी व्यक्तीऐवजी भारताच्या सनातन मूल्यांचे प्रतीक असलेल्या ‘परम पवित्र भगव्या ध्वजा’ला गुरू म्हणून स्थापित केले.
व्यक्तीच्या मर्यादा: डॉक्टरांचे मत होते की व्यक्ती कितीही महान असली तरी ती नश्वर आहे आणि तिच्याकडून मानवी चुका होऊ शकतात. व्यक्तीला गुरू मानल्यास संघटन व्यक्ति-केंद्रित बनते. त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत किंवा तिच्यातील दोषांमुळे संघटनेत फूट पडू शकते. व्यक्तिनिष्ठेपेक्षा तत्वनिष्ठा सर्वोच्च असल्यामुळे आज शंभर वर्षानंतरही संघात ‘हेडगेवारवाद’ किंवा ‘गोळवलकरवाद’ असे काहीही निर्माण झाले नाही.
शाश्वत तत्त्वाची निवड: भगवा ध्वज हा एका शाश्वत, अविकारी आणि निर्दोष तत्त्वाचे प्रतीक आहे. तो कोणत्याही दोषांपासून मुक्त आहे. तो आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृती, त्याग, शौर्य आणि ज्ञानाचा वारसा दर्शवतो. ध्वजाला गुरू मानल्यामुळे निष्ठा व्यक्तीवर नाही, तर ध्येयावर आणि तत्त्वावर केंद्रित होते. यामुळे सरसंघचालकांपासून सामान्य स्वयंसेवकापर्यंत सर्वांचा गुरू एकच राहतो आणि संघटनेत वैचारिक समरसता टिकून राहते. रा. स्व. संघात १९२८ साली गुरूपौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा ध्वजपूजन करून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडित आहे.
गुरूपौर्णिमा आणि गुरू दक्षिणा: त्यागाचा संस्कार
गुरूपौर्णिमा हा संघाच्या सहा मुख्य उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी देशभरातील शाखांमध्ये स्वयंसेवक एकत्र येऊन अत्यंत शिस्तीने भगव्या ध्वजाचे पूजन करतात. या पूजनाचा सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ‘समर्पण!’
संघाच्या कार्यासाठी लागणारा सर्व खर्च केवळ स्वयंसेवकांनी केलेल्या समर्पणातून चालतो. संघ सरकारकडून, कोणत्याही बाहेरील व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून देणगी स्वीकारत नाही; ज्यामुळे संघ स्वायत्तपणे आपले कार्य करू शकतो. प्रत्येक स्वयंसेवक वर्षातून एकदा आपल्या कष्टाच्या कमाईतून, आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार रक्कम एका बंद पाकिटात टाकून ध्वजाला समर्पित करतो. ही रक्कम गुप्त ठेवली जाते, ज्यामुळे कोणताही भेदभाव होत नाही. गुरूदक्षिणा देणे हा केवळ निधी संकलनाचा भाग नाही. तो राष्ट्रासाठी त्याग आणि समर्पण करण्याचा एक संस्कार आहे. ही प्रक्रिया स्वयंसेवकाची संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि भावनिक बंध अधिक दृढ करते.
गुरूदक्षिणेतून राष्ट्रसेवा
स्वयंसेवकांनी समर्पित केलेल्या गुरूदक्षिणेच्या निधीतून देशभरात शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक समरसता यांसारख्या क्षेत्रात दीड लाखांहून अधिक सेवा प्रकल्प चालवले जातात. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही स्वयंसेवक निःस्वार्थपणे मदतकार्य करतात. या सेवाकार्यांचा उद्देश केवळ गरजा भागवून समाजातल्या एका वर्गाचा स्वाभिमान नष्ट करणे हा नाही. सेवाकार्य समाजाला सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आहेत. ज्याला आज मदत मिळत आहे, तो उद्या स्वतः इतरांची सेवा करण्यासाठी सक्षम झाला पाहिजे. संघाच्या सेवाकार्यांचा हा अंतिम उद्देश आहे. सेवाभारती, एकल विद्यालय, विद्याभारती, आरोग्यभारती यांसारख्या संघटनांच्या माध्यमातून हा सेवा-यज्ञ एका सशक्त, संघटित आणि आत्मनिर्भर राष्ट्राच्या निर्मितीसाठी अविरतपणे सुरू आहे.
थोडक्यात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुरूपौर्णिमेच्या प्राचीन परंपरेला राष्ट्रकार्याशी जोडले. भगव्या ध्वजाला गुरू मानून संघाने व्यक्तिपूजेऐवजी तत्त्वनिष्ठेला महत्त्व दिले आणि गुरूदक्षिणेच्या माध्यमातून प्रत्येक स्वयंसेवकाला त्यागाचा संस्कार देऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेतले.







