कॅनडाच्या मॅनिटोबा येथे विमाने हवेत धडकल्याने दोन विद्यार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये २३ वर्षीय भारतीय तरुणाचा समावेश आहे, असे टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने सांगितले. एका फ्लाइट स्कूलमध्ये (वैमानिक बनण्यासाठी प्रशिक्षण देणारी शैक्षणिक संस्था) दोन सिंगल-इंजिन विमानांची टक्कर झाल्याने ही घटना घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेला श्रीहरी सुकेश हा केरळचा रहिवासी आहे.
कोट्टायम येथील न्यूज पोर्टल ओमनोरमा नुसार, सुकेश हा कोचीमधील थ्रिप्पुनिथुरा येथील स्टॅच्यू न्यू रोडचा रहिवासी आहे. ही दुर्दैवी घटना नियमित उड्डाण प्रशिक्षणादरम्यान घडली. “मॅनिटोबाच्या स्टीनबाखजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण भारतीय विद्यार्थी पायलट श्रीहरी सुकेश यांच्या दुःखद निधनाबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले. “दुकानून दूतावास शोकग्रस्त कुटुंब, पायलट प्रशिक्षण शाळा आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहे जेणेकरून त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल,” असे वाणिज्य दूतावासाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मंगळवारी (८ जुलै) सकाळी घडलेल्या घटनेबद्दल बोलताना, ‘हार्वच्या एअर पायलट ट्रेनिंग स्कूल’चे अध्यक्ष अॅडम पेनर म्हणाले की, दोघेही लहान सेस्ना (Cessna १५२ व Cessna १७२ ) विमानांमध्ये टेक-ऑफ आणि लँडिंगचा सराव करत होते, असे सीबीएस न्यूजने वृत्त दिले आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, पेनर पुढे म्हणाले की त्यांनी एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न केला आणि एकत्र येऊन धडकले. त्यांनी असेही सांगितले की विमानांमध्ये रेडिओ आहेत, परंतु असे दिसते की दोन्ही वैमानिकांनी एकमेकांना पाहिले नाही.
हे ही वाचा :
एफटीएमुळे कृषी क्षेत्राला चालना
थरूर यांच्यावर काँग्रेसची टीका, भाजपाला साजेसे वक्तव्य केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरील याचिका : सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
IREDA बाँडमध्ये गुंतवणुकीवर मिळणार कर सवलत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वैमानिकांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. या अपघातात मृत्यू पावलेला दूसरा वैमानिक नागरिक कॅनडाचा असून सवाना मे रॉयस असे त्याचे नाव आहे. कॅनडाचा ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (TSB) आणि RCMP (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस) ने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर Harv’s Air ने सर्व ट्रेनिंग थांबवली आहे.







