भारताचा कर्णधार शुभमन गिल यांनी लॉर्ड्स येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रवींद्र जडेजा याच्या खेळाचं कौतुक केलं. जडेजाने पाचव्या दिवशी नाबाद ६१ धावांची संयमी खेळी करत सामना शेवटच्या सत्रापर्यंत नेला, मात्र भारतास केवळ २२ धावांनी पराभव पत्करावा लागला.
गिल म्हणाले, “जडेजा भारताच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये गणला जातो. तो जो अनुभव व तिन्ही प्रकारांतील (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) कौशल्य आणतो, ते दुर्मीळ आहे. आज त्याने दाखवलेला संयम आणि समजूतदारपणा वाखाणण्याजोगा होता.”
या सामन्यात भारताचा खालच्या फळीचा लढा विशेष ठरला. गिलने याबाबत म्हटले, “आम्ही मागील दोन सामन्यांपासून खालच्या फळीच्या योगदानाबाबत बोलत होतो. आज त्यांनी जे धैर्य दाखवले, ते प्रशंसनीय आहे. एखादी भागीदारी 10 धावा जास्त जोडली असती, तर निकाल वेगळा असता.”
तथापि, गिलने भारताच्या वरच्या फळीतील अपयश मान्य करत म्हटले, “आम्ही चौथ्या व पाचव्या दिवशी अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही. वरच्या फळीत ५० धावांची एक भागीदारी झाली असती, तर नंतर फलंदाजी करणे सुलभ झाले असते. ही मालिकेतील पहिली वेळ होती, जेव्हा आमचा सवयीचा दर्जा गाठता आला नाही.”
या पराभवामुळे इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन सामने मॅंचेस्टर आणि लंडन येथे खेळवले जाणार आहेत.







