भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या चौथ्या कसोटीत लियाम डॉसनला आठव्या क्रमांकावर संधी दिल्यास इंग्लंडचा खालचा फलंदाजी क्रम भक्कम होऊ शकतो, असं मत माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी मांडलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.
३५ वर्षीय डॉसनने शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये इंग्लंडसाठी खेळला होता. लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीत शोएब बशीर दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर डॉसनला संधी मिळाली आहे. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना २२ धावांनी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
‘डेली मेल’मधील आपल्या कॉलममध्ये हुसैन म्हणाले, “शोएब बशीरसाठी वाईट वाटतंय, पण खेळात हेच होतं. एका खेळाडूची दुखापत दुसऱ्याला संधी देते. डॉसनकडे आता सिद्ध करण्याची मोठी संधी आहे — की तो फक्त गोलंदाज नाही तर एक दर्जेदार अष्टपैलू आहे.”
हुसैन पुढे म्हणाले, “जर डॉसन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, तर तो खालच्या क्रमाची चांगली सुरुवात ठरेल. नवव्या क्रमांकावर टेस्ट शतक करणारा गस एटकिन्सन आणि दहाव्या क्रमांकावर लॉर्ड्सवर चमकदार खेळ करणारा ब्रायडन कार्स यामुळे हा क्रम अजून मजबूत होतो.”
जॅक लीचबाबत बोलताना हुसैन म्हणाले, “हे स्पष्ट आहे की इंग्लंड आता जॅक लीचच्या पुढे पाहत आहे. लीच आणि स्टोक्स यांचं नातं चांगलं असलं तरी डॉसनसारखी अष्टपैलुत्वाची क्षमता त्यांच्यात नाही.”
हेही वाचा:
“टी-२० मालिका जिंकली, आता वनडेवर मोहोर मारण्याची वेळ!”
किंग चार्ल्सनी लॉर्ड्स टेस्ट पाहून दिले सरप्राईज
डॉसनच्या निवडीचं महत्त्व ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्याशी देखील जोडलं जातं. हुसैन म्हणाले, “या हिवाळ्यात इंग्लंड ऑस्ट्रेलियात जाणार असताना कोणते स्पिनर न्यायचे, हे ठरवणं महत्त्वाचं ठरेल. तिथे यश मिळवण्यासाठी मानसिक आणि खेळगुणांचा कस लागतो — आणि डॉसन हे दोन्ही बाबतीत सक्षम आहे.”
हॅम्पशायरकडून खेळताना डॉसनने काउंटी क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच २०२३ आणि २०२४ मध्ये त्याला ‘पीसीए प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.







