इस्राईलच्या संरक्षण दलाने (IDF) दमास्कसमधील सीरियन सैन्याच्या महत्त्वाच्या तळांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून, यामुळे इस्राईल आणि सीरिया यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. IDF ने पुष्टी केली आहे की, या हल्ल्यांपैकी एक मुख्य लक्ष्य म्हणजे सीरियन शासनाच्या सैन्य मुख्यालयाचा प्रवेशद्वार होते. तसेच राष्ट्राध्यक्ष भवनाजवळही हवाई हल्ले करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यांमध्ये सीरियाचे संरक्षण मंत्रालय आणि जनरल स्टाफ कमांडची इमारत उद्ध्वस्त झाली असून, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
हल्ल्यांमध्ये १ ठार, १८ जखमी
सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत. हे हल्ले सीरियन सरकारने दक्षिण सीरियातील स्वेइदा (Sweida) भागातील ड्रूझ अल्पसंख्याकांवर चालवलेल्या मोहिमेच्या प्रत्युत्तरात करण्यात आले आहेत. हा प्रदेश इस्राईलच्या गोलान हाइट्सच्या सीमेला लागून आहे.
सीरियाचा निषेध, इस्राईलचा इशारा
सध्या सीरियन सरकारकडून हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी याआधी त्यांनी इस्राईलच्या वर्तनाचा तीव्र शब्दांत निषेध केला होता.
इस्राईलचे संरक्षण मंत्री इस्राईल कात्ज यांनी म्हटले, “दमास्कससाठी देण्यात आलेले इशारे आता संपले आहेत. आता प्रहार होतील.
कात्ज यांनी सांगितले की, इस्राईल स्वेइदा भागात ड्रूझ लोकांचे संरक्षण करण्यासाठी “जोरदारपणे कारवाई” सुरू ठेवेल. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी याआधी सीरियन सरकारला चेतावणी दिली होती की, त्यांनी दक्षिण भागातून आपले सैनिक मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.
हे ही वाचा:
भारतात २.१६ लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार
प्रवासादरम्यान प्रसुती झाल्यानंतर बसमधून बाळ फेकून दिले
फिल्म इंडस्ट्रीने स्टंट कलाकारांना पाठबळ देणं गरजेचं
भारताने केला चमत्कार अमेरिका-चीनलाही मागे टाकले
सीमेवर हजारो ड्रूझ नागरिकांचा जमाव
स्वेइदा भागात सीरियन सैन्य आणि ड्रूझ समुदाय तसेच बेडौइन जमातींमध्ये हिंसक संघर्ष सुरू असताना, हजारो ड्रूझ नागरिकांनी इस्राईलच्या सीमा गाठण्याचा प्रयत्न केला.
नेतान्याहू यांनी ड्रूझ नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी सीमा पार करू नये आणि आयडीएफ त्यांच्यासाठी कारवाई करेल, असे आश्वासन दिले. “हे तुमचे काम नाही. तुम्ही तुमचे जीव धोक्यात टाकत आहात; तुम्ही ठार मारले जाऊ शकता, किंवा बंदी बनवले जाऊ शकता. त्यामुळे घरी परत जा आणि कारवाई आयडीएफवर सोडा,” असे नेतान्याहू म्हणाले.
अमेरिकेकडून निषेध
दरम्यान, अमेरिकेचे सीरिया विषयक विशेष दूत टॉम बॅरॅक यांनी स्वेइदा भागातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
“स्वेइदा येथील नागरिकांविरुद्ध हिंसा आम्ही संपूर्णपणे निषेध करतो. सर्व पक्षांनी त्वरित मागे हटावे आणि शांतीपूर्ण संवादातून कायमस्वरूपी युद्धविरामाचा मार्ग शोधावा,” असे बॅरॅक यांनी म्हटले.
धार्मिक स्थळांवर हल्ला
इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वेइदा प्रांतातील ‘मार मायकेल’ चर्चच्या जळालेल्या स्थितीचे फोटो शेअर करत, “इस्लामी कट्टरतावादी गट सीरियातील सर्व अल्पसंख्याक – ड्रूझ, अलावी, कुर्द आणि ख्रिश्चन – यांच्यावर हिंसक हल्ले करत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने अजून किती वेळ गप्प बसायचे?!” असा सवाल केला. सीरियाच्या सैन्य तळावर पहिल्या चेतावणी हल्ल्यानंतर, इस्राईलने सलग अनेक हवाई हल्ले केले. लाइव्ह टीव्हीवर दाखवलेल्या दृश्यांमध्ये सैन्य मुख्यालयाला प्रचंड आगीने वेढलेले दिसत होते.







