शालेय पाठ्यपुस्तके स्वतःला लिबरल म्हणवून घेणाऱ्या स्युडो सेक्युलर परिसंस्थेतील लोकांच्या आकलनानुसारच असावीत आणि त्यांनी छद्म धर्मनिरपेक्ष अजेंडाच पुढे रेटावा या आक्रस्ताळ्या हट्टामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) शालेय पाठपुस्तकांबाबत वारंवार वाद होतात.
गेल्या काही दिवसात NCERT ने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात वास्तविक इतिहासाचे दर्शन विद्यार्थ्याना घडवण्यासाठी केलेल्या एका सकारात्मक बदलामुळे स्वतःला प्रागतिक, धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या लोकांनी नवा वाद उकरून काढला आहे.
या वादाचा भाग म्हणून नुकतीच एका न्यूज चॅनेलवर चर्चा आयोजित केली होती. रुचिका शर्मा या JNU छाप हिंदुत्वद्वेष्ट्या स्युडो सेक्युलर ‘इतिहासकार’ महिलेने राजपूत राजांना इस्लामी मुघलांचे मांडलिक बनवण्यासाठी युद्धापासून शादी पर्यंत सर्व मार्ग चोखाळणाऱ्या जिहादी क्रूरकर्मा अकबर बादशहाची तुलना चक्क हिंदुपतपातशाही संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांशी केली.
तेजस्वी सूर्यासमोर काजव्याची मातब्बरी नसते याचे भान देखील तथाकथित लिबरल, छद्म पुरोगाम्यांना राहिलेले नाही हेच यातून दिसून येते. धर्मांध जिहादी आणि डाव्या परिसंस्थेतील तथाकथित विचारवंतांना पोसणाऱ्या काँग्रेसची हिंदूंच्या एकीमुळे पीछेहाट झाल्यामुळे डाव्या विचारसरणीच्या लोकांचे कसे भान सुटत चालले आहे याचा हा अजून एक दाखला आहे.
पाठ्यपुस्तकाचा वाद इयत्ता ८ वी करिता NCERT ने समाजशास्त्र विषयासाठी नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. या नव्या पुस्तकात मुघल, मराठ्यांचा इतिहास यांचा समावेश करण्यात आला आहे.या पुस्तकात मुघल शासक बाबर हा अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता, त्याने अनेक शहरांमध्ये लोकांच्या अत्यंत क्रूरपणे निर्घृण हत्या केल्या असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
मुघल काळात धार्मिक वातावरण कसे होते याबाबत माहिती देताना NCERT च्या या नवीन पुस्तकात अकबराचं शासन हे क्रौर्य, हिंसाचार आणि सहिष्णुता यांचा ताळमेळ असलेलं होते असा उल्लेख आहे. औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारे तोडले असाही उल्लेख त्यात आहे.१३ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंतचा इतिहासया पुस्तकाच्या Reshaping India’s Political Map नावाच्या भागात १३ वे शतक ते १७ वे शतक या कालखंडात भारतात घडलेल्या प्रमुख घटनांबाबत माहिती आहे.
दिल्लीचे साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मुघल शासन, शिखांचे उत्थान या सर्व घडामोडींचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्या काळात खेडेगावांची स्थिति काय होती, शहरांची रचना कशी होती यावरही हे पुस्तक भाष्य करते. मुघलांच्या सेनेने अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये कशी लूटमार केली, मंदिरं, धार्मिक स्थळं कशी तोडली हे देखील त्यात मांडण्यात आले आहे.
पुस्तकातले काही ठळक उल्लेख पुढीलप्रमाणे..
– अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम, रामेश्वरम यांसारख्या प्रसिद्ध आणि समृद्ध मंदिरांवर हल्ले केले. – मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती फोडण्यात आल्या, प्रचंड लूट माजवण्यात आली.
– हिंदूंवर जिझिया कर लावण्यात आला होता. तसंच हिंदूंचा मुघलांकडून अपमान केला जात होता. हिंदूंनो इस्लाम स्वीकारा असंही त्यांना सांगितलं जात होतं. – बाबर हा अत्यंत क्रूर शासक होता. त्याने शहरांवर हल्ले करुन लोकांची हत्या केली. महिला आणि लहान मुलांना कैदेत टाकलं.
– औरंगजेबाने काशी,मथुरा, सोमनाथ येथील मंदिरं तोडली तसंच त्याने शिखांच्या गुरुद्वाऱ्यांवरही हल्ले केले असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत. गंगा जमनी तहजीबच्या नावाखाली कट्टर इस्लामी मुघल बादशाहीचे गोडवे गाणाऱ्या डाव्या परिसंस्थेतील लोकांच्या इतिहासाच्या आकलनालाच छेद देणारे असे उल्लेख त्यांना कसे खपतील?
एवढेच नाही तर NCERT ने पाठ्यपुस्तकांच्या बाबत घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय देखील कोवळ्या वयातील विद्यार्थ्याच्या लक्ष्य करण्याच्या त्यांच्या अजेंड्याला छेद देत संस्कारक्षम वयातील मुलामुलींमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवतात हे देखील त्यांना मान्य नाही. गुलामगिरीच्या भावनेचे उच्चाटन करून राष्ट्रीयतेच्या मूल्यांचा प्रसार करणारे हे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.
२०२३ :- INDIA नव्हे भारत
यापुढील काळामध्ये NCERT पुस्तकांच्या संचामध्ये ‘INDIA’ ऐवजी ‘भारत’ छापणार आहे. सामान्यतः इंडिया हा शब्द १७५७ प्लासीच्या लढाईनंतर वापरला जाऊ लागला. सात हजार वर्षांहून अधिक जुन्या विष्णू पुराणासारख्या ग्रंथात भारताचा उल्लेख आढळतो. इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही. इंग्रजांनी हे करून त्यांच्या आगमनापूर्वी भारत अंधारात, वैज्ञानिक प्रगती आणि अज्ञानी दाखवला होता. मानसिक गुलामगिरीचे जोखड झुगारण्यासाठी गुलामगिरीची अशी प्रतीके नाकारून स्वत्वाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. इंडिया ऐवजी भारत वापरणे हा या दिशेने केलेला महत्वाचा बदल आहे.
२०२४ :- भारतीय राजकारण : नवीन अध्याय
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च अर्थात NCERT ने इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या आठव्या धड्यामध्ये बदल केला आहे. ‘भारतीय राजकारण : नवीन अध्याय’ या शीर्षकाच्या या धड्यामध्ये सध्याच्या भारतीय राजकारणात नवीन संदर्भ जोडले गेले आहेत. तसेच बाबरी पतन, गुजरात दंगल आणि हिंदुत्वाचे राजकारण या आधीच्या प्रकरणांमध्ये काही एकांगी संदर्भ काढून टाकले आहेत.
राज्यशास्त्र विषयातील ‘अयोध्या विध्वंस’ हा नकारार्थी संदर्भ काढून टाकण्यात आला आहे. ‘रामजन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या विध्वंसाचा वारसा काय आहे?’, याऐवजी ‘रामजन्मभूमी आंदोलनाचा वारसा काय आहे’ असा बदल करण्यात आला आहे. ‘डेमोक्रेटिक राइट्स’ या शीर्षकाच्या पाचव्या अध्यायात गुजरात दंगलीचा संदर्भ देण्यात आला होता. तो आता काढून टाकण्यात आला आहे. ही घटना २० वर्षे जुनी असून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे निकाली काढण्यात आल्याचे एनसीआरटीने म्हटले आहे.
या सर्व बदलांच्या मागे नव्या पिढीला या एतद्देशीय राजवंशांच्या कालखंडाच्या माध्यमातून भारतीय नीतिमूल्यांची व आपल्या सांस्कृतिक परंपरांची माहिती व्हावी असा सरळ आणि स्वच्छ उद्देश आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशातील सांस्कृतिक वैभव सांगताना हा देश ‘तीर्थक्षेत्रांची भूमी’ म्हणून वर्णन केलेले आहे, तेसुद्धा तथाकथित पुरोगामी आणि छद्म धर्मनिरपेक्ष डाव्या विचारसरणीच्या लोकांना मान्य नाही का?
हे ही वाचा:
संघाला अपेक्षित विकासाची दिशा भाजपा देईल ?
नासा बजेट कपात: ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा ट्रम्प यांना पत्र
भूपेश बघेल म्हणाले, आता संपूर्ण देश माझ्या मुलाला ओळखतो!
‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’ अशी प्रतिज्ञा शालेय विद्यार्थी रोज म्हणतात. या परंपरा नेमक्या कोणत्या आहेत याचा परिचय शालेय अभ्यासक्रमातून करून देणे संयुक्तिक आहे.
त्या परंपरांची माहिती झाल्याखेरीज नवी पिढी त्यांचा अभिमान बाळगू शकणार नाही. या सांस्कृतिक नीतिमूल्यांचे महत्त्व नव्या पिढीच्या लक्षात येईल, ते त्यांना पटेल तेव्हाच ही नवी पिढी त्याबाबत रास्त अभिमान बाळगू शकेल. या अभिमानामुळेच त्यांची मानसिक गुलामगिरीमधून सुटका होईल आणि त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ होईल. या दृष्टीने सरकार त्या अभ्यासक्रमाची रचना करीत असेल तर त्यावर अनाठायी टीका करण्याचा अधिकार कोणासही नाही.
भावी पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावी या उद्देशानेच शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला जातो. शिक्षण आणि संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचे उद्दिष्ट तेच असते. राष्ट्रीय पातळीवर देशाची एकात्मता विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भारतीय राजसत्तांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे आणि राज्याच्या पातळीवर तेथील विविधतापूर्ण सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन अभ्यासक्रमातून घडविणे तर्कसुसंगत आहे. आपली भारतीय जीवनमूल्ये, सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरा यांचे प्रतिबिंब ज्यात उमटलेले आहे असा इतिहास जोडण्याचे काम जर होत असेल तर अशा प्रयत्नांचे स्वागतच केले पाहिजे.







