उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणे सांगत दिलेला राजीनामा राजकीय वर्तुळात आणि विशेषतः विरोधकांमध्ये आश्चर्याचा धक्का ठरला आहे. राजीनाम्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतली होती, मात्र कोणत्याही आरोग्य तक्रारीचा किंवा पद सोडण्याच्या इच्छेचा काहीही उल्लेख केला नव्हता.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, राजीनाम्याच्या केवळ दोन तास आधी त्यांची धनखड यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती. त्या वेळी धनखड हे कुटुंबासोबत होते आणि उद्याच्या चर्चांसाठी तयार असल्याचे वाटत होते.
संध्याकाळी ५ वाजता रमेश, प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह यांनी धनखड यांची भेट घेतली होती. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, ही बैठक नेहमीप्रमाणेच नियमित वाटत होती, आणि राजीनाम्याचे कोणतेही संकेत दिले गेले नव्हते. उलट, त्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीचा उल्लेख केला होता.
अखिलेश प्रसाद सिंह, जे शेवटचे धनखड यांच्याशी भेटले, यांनी सांगितले की, धनखड चांगल्या तब्येतीत दिसत होते आणि त्यांनी नवीन समितीत सामाविष्ट होण्याची तयारीही व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
अकबर-लिबरलच्या गोष्टी आणि NCERT चा नवा अभ्यासक्रम
वक्फ मालमत्तांचा डेटा आता डिजिटल झाला : मदन राठोड
धनखड यांच्या आधी ‘या’ उपराष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यभागी दिला होता राजीनामा!
राजीनाम्याच्या पार्श्वभूमीला गूढ वळण
तोंडी संवाद साधतानाही, धनखड यांनी आरोग्याची कोणतीही तक्रार व्यक्त केली नव्हती. पण त्याच दिवशी, राज्यसभेत त्यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावावर चर्चा केली होती. या प्रस्तावाला १०० हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला होता.
राज्यसभेत भाषण करताना, धनखड यांनी महाभियोग प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिले आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याशीही चर्चा केली. या भाषणात देखील त्यांनी राजीनाम्याचा किंवा आरोग्याचा काहीही उल्लेख केला नव्हता.
भाजप आणि विरोधकांमध्ये हालचालींना वेग
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणनीती बैठका सुरू झाल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाबाहेर भाजप खासदारांची लगबग पाहायला मिळाली. काही रिपोर्ट्सनुसार रिकाम्या कागदांवर सही केली जात होती, मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही.
विरोधकांना वाटत होते की महाभियोग प्रस्ताव सर्वप्रथम राज्यसभेत मांडावा, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि त्यांची संविधानातील पदानुक्रमात लोकसभा अध्यक्षांपेक्षा वरची स्थान आहे. त्यामुळे ही रणनीतीचा भाग असू शकते.
उपराष्ट्रपतीपदावरील कारकीर्द आणि राजीनाम्यानंतरचे वातावरण
धनखड यांचा कार्यकाळ विवादग्रस्त ठरला आहे. अनेकदा विपक्षाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सुद्धा आणण्यात आला होता, पण तो उपाध्यक्षांकडून फेटाळला गेला होता.
आता, काँग्रेसप्रणीत INDIA आघाडी मंगळवारी सकाळी १० वाजता फ्लोअर लीडर्सची बैठक घेणार आहे. यामध्ये धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.







