हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एचआरटीसी) ची एक बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. ती अचानक रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्यांना सरकाघाट येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिलासपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये हलवण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक साक्षी वर्मा यांनी सांगितले की, अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आहेत. जखमींवर सरकाघाट सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी सरकाघाट उपमंडळातील मसेरन जवळ तारंगला येथे घडलेल्या या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, जखमींना त्वरित रुग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
हेही वाचा..
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कुलूपबंद मंदिर-गुरुद्वारा ४२ वर्षांनी उघडले!
इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!
के. एल. राहुल इंग्लंडमध्ये १०००+ धावा करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत
हरभजन म्हणतो – देश सोडून काहीच नाही!
त्यांनी एक्सवर लिहिले की, “मंडी जिल्ह्यातील सरकाघाट उपमंडळातील मसेरनजवळ तारंगला येथे एचआरटीसी बस दरीत कोसळल्यामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या दु:खद प्रसंगी, मी मृत आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि तपास सुरू आहे. अपघातानंतर सरकाघाट पोलिस स्टेशन व पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. तसंच घटनास्थळी अँब्युलन्सही तातडीने पाठवण्यात आली. दरम्यान, दरीत कोसळलेल्या बसमधून पीडितांना बाहेर काढताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागला. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचले आणि प्रशासन येण्यापूर्वीच बचावकार्य सुरू केले. अधिकार्यांच्या माहितीनुसार, बहुतांश पीडित हे स्थानिक रहिवासी होते.
दरम्यान, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही या बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “मंडीमध्ये घडलेली बस दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्वांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती मिळो. प्रशासनाने जखमींवर त्वरित आणि योग्य उपचारांची व्यवस्था करावी.”







