पुण्यात श्रीमंतांची वस्ती मानल्या जाणाऱ्या खराडी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. या ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांना समजले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई सापडले आहेत. ते या पार्टीत सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या ठिकाणी हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का, दारू, अंमली पदार्थ जप्त केले. या पार्टीत दोन महिला आणि पाच पुरुष असल्याचे समोर येत आहे. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या पार्टीतून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत टळला मोठा विमान अपघात
जायकवाडीच्या धरणसाठ्यात वाढ, मराठवाड्याला अलर्ट
मनसा माता मंदिराजवळ चेंगराचेंगरीत ६ मृत्युमुखी
‘श्रवणकुमार’ बनले रामपूरचे चार भाऊ …
गिरीश महाजन म्हणाले की, याप्रकरणात पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचे ते म्हणाले. पण एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांचा केवळ समावेश नव्हता तर त्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपाना सुरुवात झाली आहे. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, असं काही तरी होईल आणि कुटुंबातील सदस्याला अडकवण्यात येईल असे पूर्वीपासून वाटतं होते. अशा घटनेची पूर्वकल्पना होती, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिल्याचे पत्रकारांनी महाजन यांना सांगितल्यावर महाजनांनी प्रतिक्रिया दिली. मग त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, असं ते म्हणाले. हा तपासाचा भाग आहे, असे महाजन म्हणाले. प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल, असा सवाल महाजन यांनी केला. ७-८ जणांचे मोबाईल तपासल्यावर सत्य समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि तिथे नेऊन ठेवलं, असं तर झालं नाही ना? असा चिमटा महाजनांनी काढला.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील महायुती सरकारवर टीका करत आहेत. त्यांचे पती आता या घटनेत सापडले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक प्रवक्त्यांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस दलाचा असा उपयोग दबाव आणण्यासाठी केला जात आहे, अशी टीका केली जात आहे.







