धारावीत शांत अशा रात्री गप्पा सुरू होत्या… आणि अचानक एक फटाका फुटण्याचा आवाज झाला. एका क्षणापूर्वी हसणाऱ्या सरवर बानू शेख यांना क्षणार्धात समजलेही नाही की त्यांच्या खांद्यात गोळी घुसली आहे!
रविवार रात्री ९.३० च्या सुमारास, शेख या ३२ वर्षीय महिला त्यांच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर बोलत असताना ही धक्कादायक घटना घडली. सुरूवातीला त्यांना आणि त्यांच्या मैत्रिणीला वाटले की टायर फुटला किंवा फटाके फुटले, मात्र नंतर खांद्यातून रक्त येत असल्याचे लक्षात आले आणि त्या तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्या.
तपासात उघड झाले की खांद्यात गोळी अडकली होती, जी डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढली. या अनपेक्षित आणि रहस्यमय गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे.
हे ही वाचा:
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निवृत्तीपूर्वी एसीपी होणार
पिक विमा महागला; 1 रुपयात विमा बंद
पाकिस्तानचे हे कर्तृत्त्व तरी मान्य करणार की नाही ?
शेख आणि तिच्या कुटुंबीयांनी कोणत्याही वैयक्तिक वैर किंवा धमकीचा इन्कार केला असून, पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. पोलिस आता तपास करत आहेत की, एखाद्या स्थानिक गुन्हेगाराच्या हातून चुकून गोळी सुटली की ही कोणती तरी आधीच आखलेली योजना होती?
या घटनेने धारावीच्या गजबजाटात एक भीतीचे सावट निर्माण केले असून, कोणाच्या हातात बंदूक होती आणि ती गोळी का सुटली, याचे उत्तर अद्याप अंधारात आहे.







