देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०३ मिनिटांचे भाषण झाले. सेमी-कण्डक्टर पासून शेतकरी हितांच्या रक्षणापर्यंत मोदी सविस्तर बोलले. परंतु यावर चर्चा न करता मराठी मीडिया उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा करत होते. जणू हे दोघे २००६ पर्यंत एकत्र असताना महाराष्ट्र अगदी चंद्रावर नेऊन ठेवण्याच्या तयारीत होते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी नवा पक्ष काढल्यामुळे ते राहून गेले. एकत्र आलेल्या या दोघांना पतपेढीची क्षुल्लक निवडणूकही जिंकता आली नाही. पराभवामुळे सगळ्यात जास्त शोककळा ठाकरे ब्रॅंडचा गाजावाजा कऱणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर पसरली आहे. आपणच निर्माण केलेल्या या कथित ब्रॅंडचा कडेलोटही त्यांनीच करून टाकला.
मुंबईतील ‘बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उबाठा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उत्कर्ष पॅनेलला खाते सुद्धा उघडता आले नाही. मनसेला एकवेळ बाजूला ठेवू, परंतु बेस्ट आणि महापालिकेवर ज्यांनी सुमारे २५ वर्षे सत्ता राबवली त्या उद्धव ठाकरेंसाठी हे किती लाजिरवाणे आहे. ही निवडणूक छोटी होती, क्षुल्लक होती. हे एकवेळ नाही शंभर वेळा मान्य, परंतु तुम्हाला ती छोटीशी, क्षुल्लक निवडणूकही जिंकता आली नाही ना!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलणार. एक मोठी महाशक्ती उभी राहणार असा आशावाद लोकांच्या मनात असेल नसेल, परंतु चॅनलवाल्यांच्या मनात होता. महायुती सरकारने भाषेच्या संदर्भातील एक जीआर मागे घेतल्यानंतर मनसे- उबाठा यांनी एकत्रितपणे विजय मेळाव्याचे आयोजन केले होते. ठाकरे ब्रॅंडचे ढोल तेव्हापासून बडवले जात आहेत. ५ जुलै रोजी वरळीतील डोममध्ये विजय मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले. विजय मेळाव्यासाठी मराठी मीडियाने काय वातावरण निर्मिती केली होती. जणू आजच दसरा आज दिवाळी वाला माहोल.
हे ही वाचा:
जन्मस्थान मुंबई, पत्ता नवी मुंबईचा, अफगाण नागरिकाला अटक!
राज्यसभेतही पारित झाले ऑनलाइन गेमिंग विधेयक
पंतप्रधान मोदी करणार कोलकात्यात तीन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन
निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला करून दिली इतिहासाची आठवण
रिपोर्टर घरातून बाहेर पडल्यापासून त्या विजय मेळाव्याला पोहोचेपर्यंतचे वार्तांकन एका वाहिनेने दाखवले. जणू भारत चांद्रयान-४ चे लॉंचिंग करतोय. त्याचे क्षणाक्षणाचे अपडेट प्रेक्षकांना दिले जाते आहे. किती तो आनंद, किती तो उत्साह…
‘ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण अवतरला…’ काय ते शब्द काय तो उत्साह. हे सगळे लोक अत्यंत तटस्थपणे पाहात असतात किंवा पाहून हसत असतात किंवा टीव्ही बंद करत असतात. तिसरी शक्यता जास्त असते. ज्यांनी ठाकरे ब्रॅंड ‘ब्रासो’ लावून चमकवला, त्यांनाच महिन्याभरानंतर ठाकरे ब्रँडला धक्का असे मथळे द्यावे लागले. लोकांना आधीही फरक पडला नव्हता, नंतरही पडला नाही.
१८ ऑगस्ट रोजी निवडणुकीसाठी मतदान झाले होते. मतमोजणी मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री सुरु झाली. पहाटे निकाल जाहीर झाला. शशांक राव पॅनेलने १४ जागा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलने ७ जागा जिंकल्या.
तात्पर्य मराठी वृत्तवाहिन्यांनी ठाकरे ब्रँडचा कितीही बोभाटा केला तरी त्याचा शून्य उपयोग झाला. तेवढ्याच जागा या दोघांच्या संयुक्त पॅनलला मिळाल्या. पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रॅंड यशस्वी झाला असता तर सामनाने या बातमीने मथळा सजवला असता. याचा संबंध आगामी महापालिका निवडणुकांशी जोडला असता. महापालिकांवर आमचाच झेंडा फडकणार असा दावा करण्यात आला असतात. कदाचित कार्यकारी संपादकांनी ‘महाराष्ट्रात नवी पहाट…’ असा एखादा अग्रलेखही खरडला असता. शून्य जागा मिळाल्यानंतर या निकालाची सिंगल कॉलम बातमी सामनामध्ये आतल्या पानावर प्रसिद्ध झाली. परंतु सामनाकारांचे काही चुकले नाही. मुखपत्राचे काही नियम असतात. त्यानुसार मालकाच्या पराभवाचा मथळा करणे शक्य नसते.
संजय राऊतांचे लक्ष सध्या दिल्लीतील घडामोडींकडे जास्त असल्यामुळे त्यांना तर निकाल ठाऊकही नव्हता. ही निवडणूक गांभीर्याने घेण्यासारखी नाही, असे राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी ही निवडणूक ‘छोटी गोष्ट आहे रे’ अशी प्रतिक्रिया दिली आणि या पराभवाकडे फार लक्ष देऊ नका असे म्हटले. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. लोकसभेच्या निवडणुका ते लढत नाहीत, पतपेढीच्या निवडणूक निकालांवर ते बोलत नाहीत.
गोष्टी फुगवून सांगण्याची सवय झालेल्या मराठी मीडियाला मात्र जबर धक्का बसला असावा. ‘ठाकरे ब्रॅंडला मोठा धक्का’, असा मथळा सकाळने दिला. बाकी ठिकाणीही भोपळा, धुव्वा, दारुण पराभव असेच मथळे होते. जो मीडिया ठाकरे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ब्रँड आहे, असा दावा करत होता. त्यांनाच आपले शब्द गिळावे लागले. चॅनेलवर सतत तेच तेच बोलत राहिलो, सतत आरत्या ओवाळत राहिलो, म्हणजे लोकांचा त्यावर विश्वास बसतो, आपण जे दाखवतोय ते लोकांना सत्य वाटू लागते. हा मराठी मीडियाचा गैरसमज आता दूर व्हायला हरकत नाही. खरे तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत मनोज जरांगे नावाचा फूगा फुटला तेव्हाच हे मराठी मीडियाच्या ध्यानात आले पाहीजे होते.
निवडणुकांचा जीव अगदीच छोटा होता. मुंबईतील एका पतपेढीच्या निवडणुकीचा जीव तो काय ? मग लढण्याची गरज काय होती. मर्यादित वकूब असलेल्या या निवडणुकीसाठीही युती करावी लागते. तरीही जिंकता येत नाही. बरं निवडणूक बॅलट पेपरवरच झाली. त्यामुळे इव्हीएमच्या नावाने ठणाणा कऱण्याचीही सोय नाही. मतचोरीची बोंबही ठोकता येत नाही. राऊत म्हणतायत, निवडणूक गांभीर्याने घेण्यासारखी नव्हती. मग काय टाईमपास म्हणून लढवली होती का, निवडणूक? अगदीच मोदींवर टीका करून कंटाळा आलाय, चला बेस्टच्या पतपेढीची निवडणूक लढून घेऊया.
हाच भाजपा आणि अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये फरक आहे. भाजपाचे वरीष्ठ नेते प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात. लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. नेते गांभीर्याने घेतात म्हणून कार्यकर्ते सुद्धा घेतात. प्रत्येक निवडणुकीसाठी रणनीती बनवली जाते. ती काटेकोरपणे राबवली जाते. म्हणून विजय मिळतो. एव्हीएम, वोटचोरीच्या नावाने बोट मोडण्याची गरज पडत नाही.
पराभवानंतर आता दावा करतायत की, हिंमत असले तर महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. अहो, पतपेढीच्या झाल्या ना बॅलेट पेपरवर, मग त्या का नाही जिंकता आल्या. ही छोटी निवडणूक होती. हेही मान्य, परंतु त्यासाठी तुम्हाला युती करावी लागली ना. ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पॅनल सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले. सगळ्या जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकल्या. थोरल्या पवारांना एकही जागा मिळाली नाही. तिथेही बॅलेटवर निवडणुका झाल्या होत्या. जे बॅलटवर पतपेढीची निवडणूक जिंकू शकत नाही, त्यांनी महापालिकेच्या निवडणुका बॅलट पेपरवर घ्या, अशी आव्हाने देऊन मुळात मिशांना पिळ द्यावा कशासाठी? तुम्ही निवडणुका गांभीर्याने घेत नाही, मतदार तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत.
निवडणुका छोट्या असो वा मोठ्या जिंकण्याचे तंत्र वेगळे नसते. तुम्हाला मतदाराशी संपर्क करावा लागतो. तुम्हाला प्रचार करावा लागतो, तुम्हाला मतदाराच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. थोड्यात घाम गाळावा लागतो. मुखपत्रात अग्रलेख लिहून किंवा मॅरेथॉन मुलाखती देऊन पतपेढीची निवडणूकही जिंकता येत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मतदाराच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास असावा लागतो. जो तुमच्या आधीच्या कामगिरीतून, लोकांशी तुमची जी वागणूक असते त्यातून निर्माण होत असतो. ही सगळी कसरत कऱण्याची ज्यांची तयारी असते ते जिंकतात. बाकीचे हरण्याची कारणे सांगत बसतात.
महापालिकेचे घोडा मैदान दूर नाही. या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील असे मानायला वाव आहे. राजकारणात आज आहे तेच चित्र चार महिन्यानंतर पुन्हा दिसेल याची काही खात्री नाही. परंतु आज तरी हे दोघे बंधू एकत्र लढतील अशी शक्यता दिसते आहे. ठाकरे ब्रॅंडचे महत्व आजही कायम आहे, असे मानणाऱ्यांना पुन्हा एकदा या ब्रँडची चमक वाढविण्याची संधी आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







