पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रम्प यांचा सूर काहीसा नरमलेला दिसला. रशियन तेल खरेदी मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी शांतता हवी असा आग्रह धरणाऱ्या भारताच्या भूमिकेचे आणि पाठिंब्याचे कौतुक करत आभार मानले.
गेले काही दिवस ट्रम्प हे रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीबद्दल भारतावर टीका करत होते. युक्रेन युद्ध लांबवण्यात आणि भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादण्यात नवी दिल्लीचा हात असल्याचा आरोप ते करत होते. परंतु मंगळवारी, त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. यावेळी त्यांनी टीका न करता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि संघर्ष संपवण्यासाठी भारताच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
ट्रुथ सोशलवर, ट्रम्प यांनी एक टिप्पणी केली: “माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकताच एक छान फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या! ते खूप चांगले काम करत आहेत. नरेंद्र: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद!” तर पंतप्रधान मोदींनी एक्सवर या पोस्टला उत्तर दिले आहे. “माझा मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमच्या फोन कॉलबद्दल आणि माझ्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत- अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी तुमच्या पुढाकारांना आम्ही पाठिंबा देतो.”
हे ही वाचा :
भारत सरकारवर टीका करत शाहिद आफ्रिदी राहुल गांधींवर उधळतोय स्तुतिसुमने
पाकला पराभव झेपेना; टीव्हीवर सूर्यकुमार यादवबद्दल अश्लील भाषेत टीका
भारतीय क्रिकेट संघासाठी अपोलो टायर्स नवा प्रायोजक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपातर्फे ‘सेवा पंधरवडा’
ट्रम्प यांची ही नरमाईची भूमिका भुवया उंचावणारी असून काही दिवसांपासून वॉशिंग्टनमधून सातत्याने भारतावर टेक केली जात आहे. युद्धाला चालना देण्यासाठी मॉस्कोकडून तेल खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत असून यासाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर शुल्क लादले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता, व्यापारी वाटाघाटी थांबल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक पुनर्बांधणीला वेग आला असून दोन्ही बाजूंनी नवी दिल्लीत व्यापार वाटाघाटी सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात वॉशिंग्टनने रशियासोबतच्या तेल व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातीवर ५० टक्के जास्त कर लादल्यानंतर ही पहिलीच समोरासमोरची चर्चा होती.







