भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमजोर पंतप्रधान आहेत, असा दावा भारताचे आईनस्टाईन उर्फ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. अमेरिकेने एच १ बी व्हीसाबाबत जाहीर केलेले नवे धोरण हे या ताज्या दाव्याचे कारण आहे. ज्यांच्या खानदानाने या देशातील उगवत्या टॅलेंटला सडवले, या देशात आपले काही भले होणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण केली. देशात एखादी कंपनी उभी करण्यापेक्षा एच १ बी व्हीसा घेऊन अमेरिकेची चाकरी करायला, तिथेच स्थायिक व्हायला भाग पाडले. हे सगळे काँग्रेसचे कर्त्वुत्त्व. मोदींच्या तथाकथित कमजोरीचा दावा करणाऱ्यांच्या या कर्त्वुत्वाचा उहापोह घेणे गरजेचे आहे. त्या शिवाय कमजोरी म्हणजे नेमकी काय भागगड असते, हे लक्षात येणार नाही.
एच १ बी व्हीसाबाबत अमेरिकेचे नवे धोरण या नव्या गदारोळाला कारणीभूत ठरले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१बी व्हीसावर १ लाख डॉलरची फी आकारल्यानंतर देशात खळबळ माजली. ती स्वाभाविक होती. परंतु नंतर टप्प्या टप्प्याने याचा तपशील बाहेर आला. ज्यांच्याकडे सध्या व्हीसा आहे त्यांना ही फी भरायला लागणार नाही. व्हीसाच्या नुतनीकरणासाठीही नाही. यापुढे जे लोक एच१ बी व्हीसासाठी अर्ज करतील त्यांच्यासाठी हा नियम आहे.
त्यातही संरक्षण, सायबर सेक्युरीटी, आरोग्य, आदी राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्यांना सुट देण्यात आली आहे. एच१ बी व्हीसावर असलेले जे लोक देशाबाहेर आहेत, त्यांनी २४ तासांत अमेरिकेत परतावे, या अटीमुळे तर मायदेशी आलेले लोक हादरले. त्यांची प्रचंड तारांबळ झाली, परंतु पुढे अशी काही अट नसल्याचे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले.
मोदी हे देशातील सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत, ही राहुल गांधी यांची पोस्ट, याच दरम्यान आली होती. आपल्या देशात कोणी यावे, आलेल्यांनी नेमके काय करावे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्याकडे आहे की नाही? भारतीयांचे भले करण्यासाठी ते राष्ट्राध्यक्ष पदावर आलेले नाहीत. त्यांच्या देशात ज्या क्षेत्रांमध्ये इतर देशांचे टॅलेंट हवे आहे, अशा क्षेत्रात एच१बी व्हीसासाठी त्यांनी फी आकारलेली नाही. त्यामुळे त्यांना दोष देणारे रिकाम्या डोक्याचे आहेत.
हे ही वाचा:
आर्यन खानच्या मालिकेतील रणबीर कपूरच्या ‘त्या’ दृश्यावर कारवाईचे आदेश
जहीर इकबालने वाचले सोनाक्षी सिन्हाचे राशीफळ
गजराज राव आणि सीमा बिस्वास यांचा खास नातं
पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा गावात एअर स्ट्राईक केलाच नाही!
भारतीयांच्या टॅलेंट अभावी अमेरिकेत खरेच काही अडणार असेल तर ही फी रद्द करणे ट्रम्प प्रशासनाला भाग पडेल. तशी परीस्थिती नसेल तर त्यांनी काय करावे हे सांगणारे आपण कोण? आपली धोरणे जर आपण ठरवणार असू, तसा आपला हट्ट असेल तर अमेरिकेला त्यांची धोरणे ठरवण्याचा अधिकार आहे. मिचिओ काकू हे अमेरिकेतील नामांकीत भौतिक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी भाकीत केले आहे की एच१ बी व्हीसा रद्द केला तर अमेरिका कोसळेल. हे तेच व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी कधी काळी म्हटले होते की एच१ बी व्हीसा हे अमेरिकेचे गुप्त शस्त्र आहे, ज्यामुळे अमेरिका महासत्ता बनली आहे. हे असे शस्त्र आहे, ज्यामुळे अमेरिका जगभरातील टॅलेंट आपल्याकडे खेचून आणते. भारतीय तरुण यात सगळ्यात आघाडीवर आहेत. एच१बी व्हीसावर अमेरिकेत गेलेले ७१ टक्के तरुण हे भारतीय आहेत. म्हणजे याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसलेला आहे.
मोदींना शिव्या देणाऱ्यांनीही अमेरिकेत भारतीयांसाठी रोजगार मिळत नाहीत, म्हणून शिव्या घालू नये. आपल्या देशात आपल्या तरुणांना संधी उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली नसेल तर मोदींना शिव्या घालणे आणि त्यांच्या नावाने बोटे मोडणे योग्य आहे.
देशात काँग्रेसची सत्ता असताना ब्रेन ड्रेन सुरू झाले. जे तरुण बाहेर गेले त्यांनी त्या त्या देशाची भरभराट केली. आज अमेरिकेतील बड्या कंपन्यांच्या सीईओंची सत्या नडेला, सुंदर पिचाई, इंद्रा नुयी नावे पाहिली तर हे आपल्या लक्षात येऊ शकेल. काँग्रेसने देशात वातावरणच असे बनवले होते की मुठभर उद्योगपतींना त्याचा लाभ मिळत होता. देशाच्या नव्या टॅलेंटला खात्री झाली की या देशात माझे कोणत्याही प्रकारे भले होणार नाही. म्हणून देश सोडून जाणे त्यांना भाग पडले. या देशात पैसे कमावणे आणि उद्योग निर्माण करणे हा गुन्हा बनला होता. लायसन्स राजचा दबदबा होता. काँग्रेसच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या उद्योगपतींची धन होत होती. आजही काँग्रेसची मानसिकता बदलली कुठे आहे. अदाणी आणि अंबानी हे जणू दरोडेखोर आहेत, अशा पद्धतीने त्यांना शिव्या घालण्याचे काम राहुल गांधी करत असतात. जिथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार आणि पोटापाण्याचा धंदा बनला आहे, त्या काँग्रेसवाल्यांना उद्योग निर्मिती ही वाटमारी वाटायचीच.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार देशाच्या सत्तेवर आले तेव्हा देशात स्टार्टअप्सची संख्या केवळ ३५० होती. २०१६ पर्यंत ही संख्या ४५० झाली. आज त्या स्टार्टअप्सची संख्या सव्वा लाखावर गेली आहे. देशात शंभरावर युनिकॉर्न निर्माण झाल्या आहेत. अशा कंपन्या ज्यांचे बाजार मूल्य १ अब्ज डॉलर आहे. जे लोक एकेकाळी देशात संधी नाहीत म्हणून अमेरिकेत जात होते. आपला मेंदू अमेरिकेच्या विकासासाठी राबवत होते, त्यांना आता देशात संधी उपलब्ध झालेली आहे.
एकेकाळी आयआय़टी आयआयएम झालेली मुले नशीब आजमावण्यासाठी भारताबाहेर जात. भारतात आज जे युनिकॉर्न कार्यरत आहेत, त्यांचे ७० टक्के फाऊंडर आयआयटीचे विद्य़ार्थी आहेत.
ट्रॅक्सन टेक्नोलॉजी लिमिटेड ही कंपनी विविध कंपन्यांचे बाजार मूल्य, त्यांना झालेले वित्त पुरवठा याचा तुलनात्मक डेटा उपलब्ध करून देते. या कंपनीच्या डेटाबेसनुसार आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी देशात सुरु केलेल्या कंपन्यांची संख्या २४०० पेक्षा जास्त आहे, आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांची संख्या अडीच हजार पेक्षा जास्त.
आयआयएमचे विद्य़ार्थीही कमी नाहीत. हे महत्वाचे होते. भारताचे हे ज्ञान भारतातच संशोधन करते आहे. त्यामुळे पेटंट निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे.
काल पर्यंत जे टॅलेंट अमेरिकेत बडया कंपन्यांची निर्मिती करत होते ते आता भारतात कंपन्यांची निर्मिती करतायत, मोठ्या संख्येने रोजगार निर्माण करतायत. आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले स्टार्टअप्सच्या माध्यमातून काही दशलक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. भारतातील १०० युनिकॉर्नपैकी ७३ कंपन्यांचे किमान एक संस्थापक आयआय़टीयन आहेत.
जे काँग्रेसच्या काळात घडले नाही, ते आता का घडते आहे. २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट अप इंडीया, स्टॅंड अप इंडीया ही मोहीम राबवली. इज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणांतर्गत स्टार्टअप्सना तीन वर्षे आयकरातून सुट कंपन्यांच्या आणि पेटंटच्या नोंदणीसाठी सुलक्ष पोर्टल पर्यावरण कायद्यांमध्ये सवलती दिल्या. पेटंट प्रक्रीया फास्ट ट्रॅक बनवली. SIDBI च्या माध्यमातून १० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या फंडातून व्हेंचर कॅपिटल फंडना पैसे दिले जातात, जे पुढे स्टार्टअपमध्ये गुंतवले जातात. आजपर्यंत ९००० स्टार्टअपना याचा लाभ झाला आहे. नीती आयोगाने अटल थिंकींग लॅबची स्थापना केली. शाळा कॉलेजांमध्ये संशोधन संस्कृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
मोदी तरुणांचे भले करण्यासोबत त्यांचे टॅलेंट देशात वापरले जाईल याचा विचार करतायत. काँग्रेसच्या काळात हे टॅलेंट देशात सडवले जात होते. ते आता देशाच्या कामी येणार आहे.
देशातून होणारे ब्रेन ड्रेन ही मोठी समस्या होती. आयआयटी आयआयएममधील ४० ते ६० टक्के टॉपर्स देशाच्या बाहेर पडत होते. हे प्रमाण मोदींच्या काळात १५ टक्क्यांवर आले आहे. कारण या देशात आता संधी उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांना उपलब्ध आहेत. मोदींनी घडवलेली ही मूक क्रांती आहे. देशाला विकसित देश बनवण्याची घोषणा मोदींनी केलेली आहे. विकासाचा हा रथ हे टॅलेंटच पुढे नेणार आहे. या टॅलेंटचे लोणचे घातले जाईल, देशात त्यांच्या वाट्याला केवळ नैराश्य येईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या गांधी खानदानाचे कुलदिपक राहुल गांधी यांना मोदी हे कमजोर पंतप्रधान वाटतायत. कमजोर पंतप्रधान राजीव गांधी होते, ज्यांना श्रीलंका भेटी दरम्यान परेडमध्ये मानवंदना न देता एका सैनिकांने त्यांना बंदुकीच्या दस्त्याने हाणले होते. कमजोर पंतप्रधा मनमोहन सिंह होते, ज्यांना सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागायचे, कमजोर जवाहरलाल नेहरु होते, ज्यांनी काश्मीर आणि लडाखचा भाग पाकिस्तान आणि चीनसमोर गमावला. कमजोर इंदीरा गांधी होत्या, ज्यांनी बांगलादेश युद्ध जिंकूनही सिमला करारा करून हा विजय पाकिस्तानला बहाल केला.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







