वाढते भू-राजकीय तणाव आणि पुढील वर्षी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल, या अपेक्षांमुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतींनी नवे विक्रमी स्तर गाठले.
एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव ०.७२ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति १० ग्रॅम १ लाख ३९ हजार २८६ रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला. त्याचवेळी एमसीएक्सवर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव ४ टक्क्यांहून अधिक वाढीसह प्रति किलो २ लाख ३३ हजार १८३ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. हे दोन्ही मौल्यवान धातूंचे आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी’ असल्याच्या संशयावरून बंगालमधील स्थलांतरित कामगाराची हत्या
विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्ष पूर्ण बहुमत मिळवेल
यूनस यांनाही चड्डी- बनियानवर पळावे लागणार
सुशासनाच्या दिशेने मोदी सरकारचे मोठे पाऊल
सोने ११२३ रुपये म्हणजेच ०.८१ टक्क्यांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ३९ हजार २२० रुपयांवर व्यवहार करत होते, तर चांदी ९२१० रुपये म्हणजेच ४.१२ टक्क्यांच्या उसळीसह प्रति किलो २ लाख ३३ हजार रुपयांवर व्यवहार करत होती.
सोन्याच्या किमतींमधील ही वाढ प्रामुख्याने अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढले असून स्पॉट गोल्ड ०.५ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४ हजार ५०१.४४ डॉलरवर पोहोचले आहे. यापूर्वी सोन्याचा दर प्रति औंस ४ लाख ५३०.६० डॉलरपर्यंत गेला होता.
व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे की २०२६ मध्ये अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह महागाई कमी होत असल्याने आणि कामगार बाजारातील परिस्थिती सौम्य होत असल्याने दोन वेळा ०.२५ टक्क्यांची व्याजदर कपात करू शकते. तसेच वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणीही वाढली आहे.
अमेरिका-व्हेनेझुएला तणाव, रशिया-युक्रेन युद्ध आणि नायजेरियामधील आयसिसविरोधात अमेरिकन सैन्याच्या कारवाईमुळे जागतिक तणाव अधिक तीव्र झाला आहे. या महिन्यात अमेरिकन कोस्ट गार्डने व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाने भरलेला एक सुपरटँकर ताब्यात घेतला होता आणि व्हेनेझुएलाशी संबंधित आणखी दोन जहाजांना अडवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
मेहता इक्विटी लिमिटेडचे कमोडिटी विभागाचे उपाध्यक्ष राहुल कालंत्री यांनी सांगितले की, केंद्रीय बँकांकडून होत असलेली खरेदी आणि ईटीएफमध्ये सुरू असलेला सातत्यपूर्ण भांडवली ओघ सोन्याच्या किमतींना आधार देत आहे. सोन्यासाठी १ लाख ३६ हजार ५५० ते १ लाख ३५ हजार ७१० रुपये दरम्यान सपोर्ट असून, १ लाख ३८ हजार ८५० ते १ लाख ३९ हजार ६७० रुपये दरम्यान रेजिस्टन्स आहे. तर चांदीसाठी २ लाख २२ हजार १५० ते २ लाख २० हजार ७८० रुपये सपोर्ट आणि २ लाख २५ हजार ८१० ते २ लाख २६ हजार ९७० रुपये रेजिस्टन्स आहे.
तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय बँकांची आक्रमक खरेदी, अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा, अमेरिकन टॅरिफ्सच्या परिणामांबाबतची चिंता, वाढते भू-राजकीय तणाव तसेच गोल्ड आणि सिल्वर ईटीएफमधील मजबूत गुंतवणूक यामुळे यावर्षी सोने आणि चांदीच्या किमतींना मोठा पाठबळ मिळाला आहे.







