बहरीनमध्ये सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे व्हिडिओ बनवून कौतुक केल्याच्या आरोपावरून सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ इंटेरियर बहारीनच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे.
संशियत आरोपींनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केले आणि त्या हल्ल्यांचे उघडपणे कौतुक केले. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी चौकशी सुरू केली आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख अफजल खान, मोहम्मद मोआझ अकबर, अहमद मुमताज, अरसलान अली सज्जाद आणि अब्दुल रहमान अब्दुल सत्तार अशी झाली आहे. तर अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव मोहम्मद इस्राफेल मीर असे आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींची ओळख सायबर गुन्हे प्रतिबंधक युनिटने पटवली. ही युनिट भ्रष्टाचारविरोधी तसेच आर्थिक व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा महासंचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या अँटी-सायबरक्राइम संचलनालयाचा भाग आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या तपासादरम्यान या व्यक्तींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आरोपींनी हल्ल्यांचे व्हिडिओ तयार करून आणि शेअर करून इराणप्रती सहानुभूती व्यक्त केलीच, शिवाय त्या हल्ल्यांचे उघडपणे समर्थनही केले. सुरक्षा यंत्रणांच्या मते अशा प्रकारच्या पोस्टमुळे सार्वजनिक पातळीवर दिशाभूल करणारे संदेश पसरतात आणि लोकांमध्ये भीती व घबराट निर्माण होऊ शकते. बहरीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.
हेही वाचा :
“आदित्य ठाकरेंचे अर्थसंकल्पावरील आरोप म्हणजे मनी वसे ते सर्वत्र दिसे!”
‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक’ म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म
अमेरिकेच्या फेडरल सरकारी नेटवर्कमधून ‘क्लॉड एआय’ हटवणार?
इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्रह्मोस’! करारावर स्वाक्षरी
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेशी संबंधित संवेदनशील घटनांचे गौरवकरण किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.







