उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान समर्थित कथित दहशतवादी नेटवर्कशी संबंधित २२ वर्षीय मोहम्मद शेख याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातून ही अटक केली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तो सोशल मीडियाद्वारे कार्यरत असलेल्या एका नेटवर्कच्या संपर्कात होता. हे नेटवर्क भारतीय युवकांना आर्थिक प्रलोभने आणि धार्मिक कट्टरतेच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी तयार करत असल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहम्मद शेख, रा. खुदादादपूर, संजरपूर पोस्ट, निजामाबाद पोलीस ठाणे, जिल्हा आजमगड अशी झाली आहे. एटीएसने त्याच्याकडून ९ मिमी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. एटीएसच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, काही दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानस्थित गुन्हेगार शहजाद भट्टी यांच्या नेटवर्कमध्ये कथित समन्वय होता. भारताची सार्वभौमता, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्यासाठी युवकांची भरती करून त्यांना ‘स्लीपर सेल’ म्हणून तयार करण्याचा या नेटवर्कचा उद्देश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तपास यंत्रणांच्या मते, शहजाद भट्टीचे नेटवर्क सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय युवकांशी संपर्क साधत होते. त्यांना पैशांचे आमिष दाखवून आणि कट्टरतावादी सामग्री पाठवून बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. एटीएसच्या माहितीनुसार, मोहम्मद शेखला त्याच्या हँडलर्सकडून एक ‘ट्रायल मिशन’ देण्यात आले होते. दुसऱ्या राज्यातील काही भाजप नेत्यांची माहिती गोळा करणे, त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे आणि पुढे त्यांच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आल्याचा आरोप आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे मिशन पूर्ण केल्यानंतर त्याला नेटवर्कमध्ये आणखी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार होत्या.
तपास यंत्रणांचा दावा आहे की, आरोपीने या योजनेसाठी ९ मिमी पिस्तूल आणि काडतुसांची व्यवस्था केली होती आणि पुढील कारवाईची तयारी सुरू केली होती. त्याने संभाव्य लक्ष्यांची आधीच रेकी केली होती का आणि या कटात आणखी कोण सहभागी होते का, याचाही तपास सुरू आहे. एटीएसच्या तपासात असेही समोर आले आहे की, मोहम्मद शेख हा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तान व दुबईमधील मोबाईल क्रमांकांशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होता. डिजिटल पुराव्यांवरून तो परदेशातील हँडलर्सशी नियमित संपर्कात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तपास यंत्रणांनी शहजाद भट्टी व्यतिरिक्त अजमल गुर्जर आणि रझा या पाकिस्तानी नागरिकांचीही या नेटवर्कचे प्रमुख संचालक म्हणून ओळख पटवली आहे. भारतातील युवकांना विविध मिशनची जबाबदारी देण्याचे काम हेच लोक करत असल्याचा आरोप आहे. एटीएसला संशय आहे की, मोहम्मद शेख आपल्या परिसरातील इतर युवकांनाही या नेटवर्कमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मोबाईल फोन, डिजिटल नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करून इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा:
भारताच्या व्यापार करारांमुळे जागतिक बाजारपेठेची दारे होणार खुली
हिंदू तरुणाची हत्या करणारा आसिफ खान पोलिस चकमकीत ठार
बंगालच्या उपसागरात ४.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप
पाकिस्तानात बाजारपेठा रात्री ८ वाजता होणार बंद!
दरम्यान, महिनाभरापूर्वी एटीएसने याच नेटवर्कशी संबंध असल्याच्या संशयावरून आणखी दोन युवकांना ताब्यात घेतले होते. यामध्ये बाराबंकी येथील २३ वर्षीय दानियाल अशरफ आणि कुशीनगर येथील २० वर्षीय कृष्णा मिश्रा यांचा समावेश होता. तपासात दोघांची भरती इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आल्याचे समोर आले होते. एटीएसच्या माहितीनुसार, या दोघांनी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील संभाव्य लक्ष्यांची रेकी केली होती आणि विविध बँक खात्यांद्वारे निधीही प्राप्त केला होता.
मोहम्मद शेखविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४८, १५२ आणि ६१(२), शस्त्र कायदा कलम ३/२५ तसेच Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत कलम १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएस त्याला पोलीस कोठडीत घेऊन पुढील चौकशी करण्याची तयारी करत आहे.







