29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरविशेषमुंबईत धुरक्याची चादर....श्वास घेणेही झाले जड

मुंबईत धुरक्याची चादर….श्वास घेणेही झाले जड

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम

Google News Follow

सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा तिसरा क्रमांक असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले. त्याचे प्रत्यंतर गेले काही दिवस मुंबईत येत आहे. मुंबईवर धुके आणि धुरक्याची चादर पसरली असून त्यातून सर्वसामान्य मुंबईकरांना श्वास घेणेही मुश्किल बनले आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा हवेचा निर्देशांक १७६पर्यंत पोहोचला आहे. मुंबईची दृश्यमानताही कमी झालेली आहे. त्यामुळे प्रचंड उष्णता, दमटपणा यात वाढ झालेली दिसून येते. मुंबईच्या हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढले असून पीएम १० आणि पीएम २.५ या आकाराच्या कणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा हे प्रमाण तिप्पट असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईतल्या या प्रदूषणाला विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली इमारतींची बांधकामेही कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. यावरूनच मुंबई महानगरपालिकेत खडाजंगी झाली होती. बांधकाम स्थळांवर असलेले दगडमातीचे ढिगारे, रेडी मिक्स कॉन्क्रिट प्रकल्प यावरून महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला. हे सगळे रेडी मिक्स काँक्रीट प्लॅन्ट मुंबईबाहेर हलवा असे आदेश त्यांनी दिले पण अतिरिक्त पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तसे करता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मुंबईतील काही प्रमुख बांधकाम साईट्सवरच असे प्लॅन्ट असल्याचे त्यांचे म्हणणे होते. जवळपास ११ हजार अशा बांधकाम साईटस आहेत, जिथे सध्या बांधकामे सुरू आहेत अशी माहिती समोर येते आहे.

पीएम १० आणि पीएम २.५ या आकाराचे कण हे थेट नाकावाटे फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत असल्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. १२८ ते १३६ µg/m³ या प्रमाणात या कणांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे एकूणच हवेचा निर्देशांक १८९ ते १९०च्या घरात पोहोचला आहे. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावा लागतो आहे. पण हे निर्देशांक प्रमाणित नाहीत असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र मुंबईतली दृश्यमानता कमी झालेली आहे वास्तव लपलेले नाही.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो, उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक!

जामिया विद्यापीठात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष

टायगरवरील हल्ल्यानंतर आरोपींना मिळत होते मीडियातून अपडेट्स

शीख समुदायाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच राहुल गांधींची रॅली

मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, त्यामुळे रस्त्यांवर पसरलेली धूळ, हवेतले धूळीकण याचा प्रचंड त्रास होत असून त्यामुळे श्वसनाचे विकार, खोकला, सर्दी यामुळे लोक त्रस्त असल्याच्या तक्रारीही येत आहेत. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये बांधकामस्थळांची तपासणी, रस्त्यांची स्वच्छता, बांधकाम व पाडकामातील कचऱ्यावर देखरेख आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपक्रमांवर कारवाई यांचा समावेश आहे.

महापालिकेने बांधकामस्थळांसाठी हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने २८ कलमी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी तपासण्यासाठी ७६ प्रभागस्तरीय पथके तैनात करण्यात आली आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये कारणे दाखवा नोटीस, काम बंद करण्याची नोटीस आणि बांधकामस्थळ सील करणे यांसारख्या कारवाईचा समावेश आहे. या कारवाईसाठी तपासणी अहवाल, छायाचित्रे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आधार घेतला जातो.

बांधकामस्थळांवर सेन्सर आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३,१६६ बांधकामस्थळांवर अशी यंत्रणा बसवण्यात आली असून ती केंद्रीय डॅशबोर्डशी जोडण्यात आली आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून महापालिका हवेच्या गुणवत्तेची नोंद आणि त्यातील बदलांवर लक्ष ठेवते.

मुंबईतील बेकऱ्यांमधूनही प्रदूषण होत असल्याची माहिती समोर येत असताना पालिकेचे यासंदर्भातील म्हणणे आहे की, मुंबईतील एकूण कण प्रदूषणाच्या उत्सर्जनात बेकऱ्यांचा वाटा सुमारे ३.५ टक्के आहे. मुंबईतील एकूण ५९३ बेकऱ्यांपैकी २०९ बेकऱ्या आधीपासूनच स्वच्छ इंधनाचा वापर करत होत्या. त्यानंतर आणखी १७५ बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाकडे वळण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर ६९ बेकऱ्यांमध्ये इंधन बदलण्याचे काम सुरू आहे. ८७ बेकऱ्या अद्याप नियमांचे पालन करत नसून ८ बेकऱ्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा