28 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरविशेषयासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

प्रकरणात खोटेपणाने गोवण्यात आल्याचा दावा

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिक याने १९९० मधील काश्मिरी पंडित परिचारिका सरला भट हत्या प्रकरणात न्यायालयीन कारवाईला पुढे आव्हान न देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, दोष सिद्ध झाल्यास स्वतःला मृत्युदंड देण्याची मागणीही त्याने केली आहे. मात्र, याच प्रतिज्ञापत्रात मलिकने सरला भट यांच्या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा करत आपल्याला राजकीय कारणांमुळे या प्रकरणात गोवण्यात आल्याचे म्हटले आहे.

तिहार तुरुंगात असलेल्या यासीन मलिकने अतिरिक्त सत्र न्यायालयात २५ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले. हे प्रतिज्ञापत्र त्याच्या वकिलामार्फत न्यायालयात सादर करण्यात आले. मलिकने म्हटले आहे की, तो आता या खटल्यातील कारवाईला पुढे आव्हान देणार नाही. मात्र, हा निर्णय म्हणजे अभियोजन पक्षाचे आरोप किंवा स्वतःचा गुन्हा मान्य केल्याचे समजू नये, असेही त्याने स्पष्ट केले आहे. मलिकच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात त्याला तीन दशकांहून अधिक काळानंतर आरोपी करण्यात आले असून, ही कारवाई राजकीय परिस्थिती आणि निर्णयांमुळे झाली आहे. आपण या प्रकरणात खोटेपणाने गोवले गेलो असल्याचा दावा त्याने केला आहे.

मलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात सरला भट यांच्यावर सुरक्षा यंत्रणांना माहिती पुरवल्याचा आरोप फेटाळला. सरला भट या सुरक्षा दलांसाठी गुप्तपणे काम करत नव्हत्या आणि त्या निष्पाप नागरिक होत्या, असे त्याने म्हटले आहे. तसेच, सरला भट यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोपही त्याने नाकारला. ८ एप्रिल १९९० रोजी आपल्याला गंभीर दुखापत झाली होती आणि आपण अनेक आठवडे कोमात होतो, असा दावा मलिकने केला. त्यामुळे १९ एप्रिलला झालेल्या हत्येत आपण सहभागी होणे किंवा तिचे नियोजन करणे शक्य नसल्याचे त्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

या सर्व आरोपांना नाकारतानाच मलिकने एक महत्त्वाची भूमिका घेतली आहे. वैयक्तिक परिस्थिती आणि दीर्घ विचारानंतर आपण खटल्याला पुढे आव्हान न देण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने आपल्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. हा निर्णय गुन्ह्याची कबुली म्हणून पाहू नये, असे त्याने पुन्हा स्पष्ट केले आहे.

यापूर्वी २०२२ मध्ये दहशतवादासाठी निधी पुरवल्याच्या प्रकरणातही मलिकने आरोपांना आव्हान दिले नव्हते. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेत मृत्युदंडाची वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे.

हे ही वाचा:

कराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

हवाई दलाच्या स्वदेशी शस्त्रसामर्थ्यात ‘खगांतक-243’ची भर

भारत-इराण जवळीकतेने अमेरिकेला मुरडा

कोलकात्यात तृणमूलचे कार्यालय फोडले

दरम्यान, याच प्रतिज्ञापत्रातून मलिकने आपल्या पाकिस्तानी पत्नी मुसाल हुसैन मलिकला घटस्फोट देण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. दोघांनी २००९ मध्ये विवाह केला होता. त्यांना रझिया सुलताना नावाची १३ वर्षांची मुलगी आहे. मलिकने म्हटले आहे की, गेल्या आठ वर्षांपासून त्याला पत्नी आणि मुलीशी फोनवर किंवा व्हिडिओद्वारे संपर्क साधता आलेला नाही. आपल्या परिस्थितीचे ओझे पत्नीने आयुष्यभर वाहू नये आणि तिने सन्मानाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

सरला भट हत्या प्रकरण

१९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला असताना एसकेआयएमएस रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सरला भट यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या झाली. हे प्रकरण तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित राहिले. जम्मू-काश्मीर राज्य तपास यंत्रणेने २०२५ मध्ये या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. जून २०२६ मध्ये याप्रकरणी ७३७ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात यासीन मलिकसह अन्य आरोपींची नावे आहेत. तपास यंत्रणेने मलिकवर या हत्याकांडामागे प्रमुख भूमिका असल्याचा आरोप केला आहे. मात्र, मलिकने हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे यासीन मलिकच्या प्रतिज्ञापत्रानंतर न्यायालय पुढे काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा