29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेष'त्या' ओमानी वैमानिकाच्या सोशल मीडियात अल कायदाच्या जवाहिरीचा फोटो

‘त्या’ ओमानी वैमानिकाच्या सोशल मीडियात अल कायदाच्या जवाहिरीचा फोटो

Google News Follow

Related

सोशल मीडियावर अल-कायदा दहशतवाद्यांचे फोटो, कट्टरतावादी संकेतस्थळांना कथित भेटी, अत्यंत धार्मिक विचारसरणी आणि ओमान एअरमधील वादग्रस्त कार्यकाळ… फ्लायदुबईच्या ओमानी सहवैमानिकाबाबत एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत असून, तो इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लाइटच्या कॉकपिटपर्यंत पोहोचला कसा, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

अल अरबीया या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या सहवैमानिकाची ओळख हमाम अल-हमामी अशी झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला फ्लाइट एफझेड१०७३ मध्ये त्याने भारतीय कॅप्टन स्मित माछर यांच्यावर हल्ला केला. विमानाचा ताबा घेऊन ते विमान कोसळवण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

३० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर सहवैमानिकाबाबत फारशी माहिती समोर आलेली नव्हती. सध्या तो संयुक्त अरब अमिरातीच्या ताब्यात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वी या सहवैमानिकाने ‘इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचे प्रशिक्षण घेतले होते’, असे म्हटले होते; मात्र त्यांनी त्यावेळी याबाबत कोणतेही तपशील दिले नव्हते. आता या व्यक्तीची ओळख हमाम अल-हमामी अशी झाली असून, त्याचे वडील ओमानी आणि आई सीरियन असल्याचे सांगितले जात आहे.

सीबीएस न्यूज आणि सीएनएनच्या वृत्तांनुसार, अल-हमामीने आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये घालवला. ओमान सरकारने मात्र त्याचे राष्ट्रीयत्व अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. काही वृत्तांनुसार, अल-हमामीकडे दुहेरी नागरिकत्व असण्याची शक्यता आहे. जर हे खरे ठरले, तर इस्रायलला जाणाऱ्या विमानाच्या वैमानिक म्हणून त्याला काम करण्याची परवानगी कशी मिळाली, हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा:

ओमानी वैमानिकाला ज्याने पाठवले, त्याला मोजावी लागेल मोठी किंमत!

सप्टेंबरमध्ये भारताची कच्च्या तेलाची आयात २०२६ मधील उच्चांकी पातळीवर

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

भारताला दिवसभरात सहा सुवर्णपदकं!

ओमानचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नाहीत. २०२० मध्ये संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायल यांच्यात संबंध सामान्य करण्यासाठी झालेल्या अब्राहम करारानुसार, इस्रायलशी राजनैतिक संबंध नसलेल्या देशांतील वैमानिकांना तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानांचे संचालन करण्यावर निर्बंध आहेत.

फ्लायदुबईमध्ये सुमारे आठ महिन्यांपूर्वी रुजू होण्यापूर्वी अल-हमामीने सरकारी मालकीच्या ओमान एअरमध्ये तसेच मोरोक्कोच्या राष्ट्रीय विमान कंपनी रॉयल एअर मॅरोकमध्ये काम केले होते. ओमान एअरमधील कार्यकाळात त्याच्या कट्टरतावादी विचारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच त्याने कट्टरतावादी संकेतस्थळांना भेटी दिल्याचेही आढळून आल्याचे वृत्त आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, आता हटवण्यात आलेल्या त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर केवळ दोन पोस्ट होत्या. विशेष म्हणजे, या दोन्ही पोस्ट ३० सप्टेंबरच्या घटनेच्या दिवशी, म्हणजे बुधवारी, प्रकाशित झाल्या होत्या.  या व्हिडिओच्या शेवटी अयमान अल-जवाहिरीचा फोटो होता. अल-जवाहिरी हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. अमेरिकेतील ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात तो ओसामा बिन लादेनसोबत सहभागी होता. बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-जवाहिरीने अल-कायदाचे नेतृत्व केले. २०२२ मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

या व्हिडिओमध्ये हमाम खलील अबू-मुलाल अल-बलावी याचाही फोटो होता. तो अल-कायदाशी संबंधित कुख्यात दहशतवादी होता. २००९ मध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामागे त्याचा हात होता. या हल्ल्यात सात अमेरिकन सीआयए अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

अल-हमामीच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील दुसऱ्या व्हिडिओमध्ये मक्का, मदिना आणि जेरुसलेम या इस्लाममधील तीन पवित्र स्थळांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले छायाचित्र दाखवण्यात आले होते.

या हालचालींबाबत चिंता निर्माण झाल्यानंतर ओमान एअरने त्याला उड्डाणाच्या जबाबदारीतून हटवून कार्यालयीन काम सोपवले. मात्र, कार्यालयीन काम त्याला पसंत नव्हते. अखेर २०२५ च्या सुमारास त्याने ओमान एअर सोडल्याचे सांगितले जाते. ‘हमाम अल-हमामी’ या नावाने असलेल्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये त्याने ओमान एअरमध्ये सात वर्षे काम केल्याचे नमूद केले होते. त्यानंतर जून २०२५ मध्ये तो रॉयल एअर मॅरॉकमध्ये रुजू झाला आणि जानेवारी २०२६ मध्ये त्याने ही नोकरी सोडल्याचे प्रोफाइलमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, या प्रोफाइलमध्ये फ्लायदुबईमधील नोकरीचा उल्लेख नव्हता.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा