31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरस्पोर्ट्सहारकर जीतने वालों को टीम इंडिया कहते हैं!

हारकर जीतने वालों को टीम इंडिया कहते हैं!

भारताचा तिरंगा आशिया चषकावर!

Google News Follow

क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना म्हटला की उत्सुकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचते. त्यातच अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये असा काही थरार रंगला की, अखेरच्या चेंडूपर्यंत कोण बाजी मारणार, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले होते. मात्र, भारतीय युवा शिलेदारांनी जिद्द, चिकाटी आणि विजिगीषू वृत्तीच्या जोरावर पाकिस्तानच्या हातून विजय अक्षरशः खेचून आणला. पाकिस्तानने उभारलेल्या ३३७ धावांच्या डोंगराचा यशस्वी पाठलाग करत भारताने एका विकेटने विजय मिळवला आणि अंडर-१९ आशिया चषकावर दिमाखात नाव कोरले.

पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दमदार सुरुवात मिळाली. आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. आर्यवीरने ५८ धावांची आक्रमक खेळी केली, तर लक्ष्यने ८० धावा फटकावत संघाला भक्कम स्थितीत आणले. मात्र, या दोघांच्या माघारीनंतर भारतीय डावाला गळती लागली. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्याने सामन्याचे पारडे पाकिस्तानच्या बाजूने झुकू लागले.

भारताची अवस्था बिकट झाली असतानाच मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांनी मैदानावर किल्ला लढवला. नवव्या विकेटसाठी या जोडीने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ५७ धावांची निर्णायक भागीदारी रचली. मनालने ३२ चेंडूंत ४७ धावांची आक्रमक खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. तो बाद झाल्यानंतरही मोहितने हार मानली नाही. २६ चेंडूंत नाबाद ४९ धावा ठोकत त्याने भारतीय विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पाच चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांनी सजलेली त्याची खेळी संस्मरणीय ठरली.

शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी तीन धावांची गरज होती. संपूर्ण मैदानाचा श्वास रोखला गेला होता. अशा निर्णायक क्षणी मोहितने चेंडू सीमापार धाडत चौकार ठोकला आणि भारतीय गोटात जल्लोषाचा स्फोट झाला. एका विकेटने मिळालेला हा विजय केवळ विजेतेपदाचा नव्हता, तर संकटातही हार न मानणाऱ्या भारतीय युवा संघाच्या जिद्दीचा होता.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत नऊ बाद ३३७ धावा उभारल्या. उस्मान खानने १०७ धावांची शतकी खेळी केली, तर अब्दुल कादिरने ८० आणि कर्णधार फरहान युसूफने ६३ धावांचे योगदान दिले. एकवेळ पाकिस्तानची धावसंख्या चार बाद २९९ अशी भक्कम होती. मात्र, अखेरच्या सहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानचे पाच फलंदाज बाद केले. काव्या पटेलने चार, तर चिगुरुपती वेंकटने तीन विकेट घेत पाकिस्तानच्या धावांना लगाम घातला.

फलंदाजांची झुंज, गोलंदाजांचा निर्णायक मारा आणि अखेरच्या चेंडूवर मोहितचा विजयी चौकार अशा सर्वच आघाड्यांवर भारतीय युवा संघाने आपली गुणवत्ता सिद्ध केली. पाकिस्तानला नमवत आशिया चषक जिंकणाऱ्या या युवा शिलेदारांच्या कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मान अभिमानाने उंचावली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा