30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरस्पोर्ट्समुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिन तेंडुलकरची 'बॅटोग्राफी'

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिन तेंडुलकरची ‘बॅटोग्राफी’

‘पहिल्या बॅट’पासून ते अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास

Google News Follow

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना समर्पित ‘बॅटोग्राफी’ हा अनोखा विभाग सुरू केला आहे. एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचा हा विशेष भाग असून, यामध्ये १९७८ ते २०१३ या कालावधीतील सचिन यांच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास उलगडणाऱ्या २५ बॅट्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या खासगी संग्रहातील काही विशेष हेडगियर आणि कपडेही येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते ‘बॅटोग्राफी’चे अनावरण करण्यात आले.

१६ नोव्हेंबर २०१३ रोजी वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकर यांचा २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना संपला होता. या ऐतिहासिक घटनेला १३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दिवस निवडण्यात आला. याच मैदानावर २७ नोव्हेंबर १९८३ रोजी अवघ्या १० वर्षांच्या सचिन यांनी पहिल्यांदा कसोटी सामना पाहिला होता. त्यावेळी त्यांनी आपले आदर्श क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांना शतक झळकावताना पाहिले होते.

सचिनच्या या बॅट आहेत संग्रहात

या संग्रहाची सुरुवात १९७८ मध्ये त्यांची मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या ‘काश्मीर विलो’ बॅटपासून होते. त्यावेळी सचिन अवघ्या पाच वर्षांचे होते. तर या संग्रहाचा समारोप वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या आपल्या अखेरच्या कसोटी डावात त्यांनी वापरलेल्या बॅटने होतो. या संग्रहात काही अत्यंत खास बॅट्सचाही समावेश आहे. यामध्ये १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावताना वापरलेली बॅट आहे. तसेच सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी १९९८ मध्ये भेट दिलेली बॅट आणि २००३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात वापरलेली बॅटही येथे ठेवण्यात आली आहे. या विश्वचषकात सचिन यांना ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय १६ मार्च २०१२ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळताना आपले १०० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी त्यांनी वापरलेली बॅटही या संग्रहाचे विशेष आकर्षण आहे.

बॅट्सच्या संग्रहासोबतच सचिन यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणाऱ्या अनेक वस्तूही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी ट्रॉफीची जर्सी, २०० व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात वापरलेली भारतीय जर्सी आणि हेल्मेट यांचा समावेश आहे. तसेच वानखेडे स्टेडियमवर निरोपाचे भाषण देताना त्यांनी ज्या कागदाचा वापर केला होता, तो कागदही येथे जतन करण्यात आला आहे.

या अनावरण सोहळ्याला आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “२४ वर्षे माझे आयुष्य २२ यार्डांच्या खेळपट्टीभोवती फिरत राहिले. या संपूर्ण प्रवासात माझ्या बॅट्स कायम माझ्यासोबत होत्या. त्या माझ्या हातांचाच एक भाग असल्यासारखे मला नेहमी वाटायचे. प्रत्येक बॅट मला एका विशिष्ट काळाची, ड्रेसिंग रूमची, खेळपट्टीची किंवा प्रेक्षकांच्या जल्लोषाची आठवण करून देते.

“१९७८ मध्ये मी पहिल्यांदा हातात घेतलेली बॅट, जी माझी बहीण काश्मीरमधून घेऊन आली होती, तेथपासून ते वानखेडे स्टेडियमवर माझ्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय खेळीसाठी निवडलेल्या बॅटपर्यंतचा हा प्रवास असंख्य आठवणींनी भरलेला आहे. या आठवणींमध्ये माझ्यासोबत त्या क्षणांचा भाग असलेल्या अनेक लोकांचाही सहभाग आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या प्रयत्नांमुळे या सर्व बॅट्स वानखेडे स्टेडियमवर एकत्र पाहायला मिळत आहेत, हे पाहून खूप आनंद होत आहे. याच ठिकाणाहून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली होती.”

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “आज आम्ही ज्या विशेष विभागाचे अनावरण केले आहे, ती एका असामान्य खेळाडूला वाहिलेली आदरांजली आहे. सचिन तेंडुलकर यांनी या शहराला आणि संपूर्ण देशाला असा वारसा दिला आहे, ज्याची आठवण अनेक वर्षे जपली जाईल. भारतातील पहिल्या ‘म्युझियम अँड स्टेडियम टूर’ची सुरुवात केल्यानंतर गेल्या एका वर्षात २३ हजारांहून अधिक लोकांनी एमसीए संग्रहालय आणि वानखेडे स्टेडियमला भेट दिली आहे.

अनावरण सोहळ्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिन तेंडुलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत अनौपचारिक संवादाचेही आयोजन करण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा