33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरविशेषदादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

Google News Follow

मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दादरमध्ये नेमकं चाललंय काय? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य दादरकराला पडलाय. एकीकडे फेरीवाल्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक प्रमाण परप्रांतीयांचं झालंय, दुसरीकडे ‘जी-नॉर्थ’मध्ये क्यूआर कोड वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचे आरोप समोर येतायत, आणि दिवाळीत ‘मॅडम’ना पन्नास हजार रुपये दिल्याची धक्कादायक चर्चा रंगलीय! दिवसाढवळ्या आणि पहाटेही मारहाणीच्या घटना घडत असताना पोलीस आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतायत का? या संपूर्ण व्यवस्थेला कोणाचा तरी वरदहस्त आहे का? आज आपण दादरकरांच्या संतापाचा आणि दादरच्या धगधगत्या वास्तवाचा अक्षरशः पंचनामा करणार आहोत.

एन. सी. केळकर रोड, डिसिल्व्हा रोड आणि आसपासच्या भागात फेरफटका मारला की फेरीवाल्यांची बेसुमार गर्दी दिसते. या गर्दीमागे एक मोठं अर्थकारण दडलंय. ‘जी-नॉर्थ’ विभागातील क्यूआर कोड वाटपात मोठा ‘घपला’ झालाय. ज्यांची कोणतीही अधिकृत जागा नाही, अशा परप्रांतीय फेरीवाल्यांना ५० ते ६० हजार रुपये घेऊन क्यूआर कोड दिल्याचा गंभीर आरोप केला जातोय. जर पात्रता निकष असतील, तर मग हे क्यूआर कोड कोणाच्या आधारावर आणि कोणाच्या इशाऱ्यावर वाटप केले गेले?

आणखी एक खळबळजनक मुद्दा म्हणजे, एका १६ वर्षांच्या मुलाकडे क्यूआर कोड आढळल्याची चर्चा आहे. १२ वर्षांपूर्वी सर्वेक्षण झालं तेव्हा हा मुलगा अवघा ४ वर्षांचा होता; मग चार वर्षांच्या मुलाचा सर्वे कसा झाला आणि त्याचे नाव यादीत कसे आले? हा केवळ प्रशासकीय गोंधळ आहे की यामागे मोठा खेळ दडलाय? या संपूर्ण क्यूआर कोड वाटपाची कसून चौकशी होणं गरजेचं आहे.

या व्यवस्थेत ‘लीडर्स’ची मक्तेदारी कशी चालते, याचं उदाहरण म्हणजे नोकरांच्या नावावर बनवलेले क्यूआर कोड. काही हप्तेखोर लीडर्सनी आपल्या नोकरांच्या नावावर प्रत्येकी ८ ते १० जागांचे क्यूआर कोड बनवून घेतले आहेत. कागदावर किंवा कोडवर नाव नोकराचं, पण प्रत्यक्षात जागा आणि मालकी लीडरचीच!

दुसरीकडे, महापालिकेच्या जागेवर खुलेआम भाडेवसुली सुरू असल्याचा दावा केला जातोय. ए-टू-झेड दुकानासमोर एकाच मालकाचे सहा धंदे चालत असल्याचं सांगितलं जातंय, तर काही ठिकाणी प्रत्येक फेरीवाल्याकडून दररोज ५०० रुपये—म्हणजेच महिन्याला सुमारे ९० हजार रुपये वसूल केले जातायत का? कोणतीही मेहनत किंवा कायदेशीर परवानगी नसताना बीएमसीच्या जागेवरून हा पैसा कोणाच्या खिशात जातोय? याची गुप्त चौकशी होण्याची मागणी आता जोर धरतेय.

आता सर्वात स्फोटक मुद्दा—’मॅडम’ कोण? दरबार हॉटेल परिसरात पूर्वी ५० ते ६० असलेली परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या आता १०० च्या घरात गेल्याचं सांगितलं जातंय. तिथल्या काही विक्रेत्यांकडे विचारणा केली असता, “दिवाळीत ‘मॅडम‘ना पन्नास हजार रुपये दिले आहेत, आमचे सेटिंग झाले आहे,” असे धक्कादायक दावे समोर येतायत. आता ही ‘मॅडम’ नेमकी कोण? काहींनी घाबरून नाव सांगितलं नाही, पण हा आरोप अत्यंत गंभीर आहे. जर खरोखरच ‘सेटिंग’च्या नावाखाली पैशांची देवाणघेवाण होत असेल, तर ती शिवाजी पार्कच्या हद्दीत सुरू असलेली उघड लूटमार आहे. यामागे कोण आहे, याचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे.

कारवाईचा दिखावा होतोय की खरा वचक उरलाय? एन. सी. केळकर रोड आणि डिसिल्व्हा रोडवर विना-क्यूआर कोड असलेल्यांवर कारवाई करण्याऐवजी फक्त १२०० रुपयांचा दंड मारून सोडून दिलं जातंय, जो हप्तेखोर लीडर भरत असल्याचं सांगितलं जातंय. १२०० रुपयांच्या दंडाने काय फरक पडणार? यामुळे कारवाईऐवजी फेरीवाल्यांना एकप्रकारे प्रोत्साहनच मिळतंय का, असा सवाल विचारला जातोय?

आणि कायदा-सुव्यवस्थेचं काय? गेल्या १० दिवसांत मारहाणीच्या दोन गंभीर घटना घडल्याचा आरोप आहे—दहा दिवसांपूर्वी डिसिल्व्हा गल्लीत दुपारी १२:३० वाजता वांद्रे येथील तरुणांनी एका फेरीवाल्याला मारहाण केली, तर काल सकाळी ६:३० वाजता १०-१२ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली. सकाळी कामधंद्यावर जाणाऱ्यांनी हा धिंगाणा पाहिला. जर लहान घटनांवर अशीच उदासीनता राहिली, तर उद्या मोठे गुन्हे घडल्यास त्याला जबाबदार कोण?

या संपूर्ण प्रकारात शेवाळे, शहा, मणिराल, सत्या आणि दिलीप यांसारख्या नावांची चर्चा समोर येतेय. कोणावर तडीपार प्रोसिजर सुरू असल्याचा उल्लेख होतोय, तर कोणाकडून ५-५ हजार रुपये किंवा भाडे जमा केल्याचे आरोप आहेत. या सर्वांची चौकशी गुन्हे शाखेकडून व्हावी, अशी मागणी दादरकर करत आहेत.

पण प्रश्न इथेच संपत नाही. दादरमध्ये परप्रांतीयांचं प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक झालं असताना मराठी फेरीवाल्यांचं काय? उद्या काही अनुचित प्रकार घडला तर मराठी फेरीवाल्यांना आणि सामान्य दादरकरांना वाचवणार कोण? निवडणुकीच्या काळात आठ-आठ दिवस घरी न जाणारे स्थानिक आमदार आणि नगरसेवक आज दादरच्या या समस्येकडे पाहायला आठ मिनिटेही का देत नाहीत? दादरचा वाली कोण? सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? गुन्हे शाखेकडून निष्पक्ष चौकशी होणार का, आणि या ‘सेटिंग’च्या राजकारणावर कधी लगाम कधी बसणार?

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा