30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरसंपादकीयअहंकार गुंडाळून दारोदारी फिरण्याची वेळ आली

अहंकार गुंडाळून दारोदारी फिरण्याची वेळ आली

Google News Follow

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सगळा काँग्रेस पक्ष एकाच वेळी विखारी आणि विनोदी बनलेला आहे. द्रमुक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची मनधरणी कऱण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे द्रमुक आणि पवार गटाच्या नेत्यांची गाठभेट घेणार असल्याचे जाहीर झाले. थोडक्यात ते आग विझवण्याचा प्रय़त्न करतायत. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते इम्रान मसूद मात्र या दोन्ही पक्षांवर जळजळीत टीका करतायत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते शरद पवारांवर टीका करतायत. समजूत काढायची की काड्या घालायच्या याबाबत पक्षात गोंधळ सुरू आहे. युवराज राहुल गांधी आता खानदानाचा अहंकार गुंडाळून द्रमुकला लोटांगण घालण्याच्या तयारीत आहेत.

पुढील चार दिवसात देशाच्या राजकारणात जे काही घडणार आहे, ते स्वत:ला देशाच्या राजकारणातील प्रथम परिवार समजल्या जाणाऱ्या गांधी घराण्याचा अहंकार आणि माज उतरवणारे आहे. लायकी नसताना स्वत:ला खूप मोठे नेते समजणाऱ्या राहुल गांधी यांना जागा दाखवणारे आहे. चुका करा, माज दाखवा आणि नंतर नाक रगडा हे राहुल गांधी यांच्या राजकारणाचे सूत्र बनले आहे. उद्या सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष सत्र सुरू होणार आहे. हे सत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या आत्मकेंद्रीत राजकारणाचा कडेलोट ठरणार आहे. राहुल यांचा पराभव निश्चित आहे. हा पराभव २०२९ च्या पराभवाची नांदी ठरणार आहे.

द्रमुकने संसदीय गटाची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या मतदार संघ पुनर्रचना आणि नारीशक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. तेव्हा त्यांची समजूत काढायचे सोडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पत्रकार परीषदा घेत होते. द्रमुकच्या नेत्या कणिमोळी यांनी दिल्लीत येऊन पक्षाच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विधेयकाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बहुधा काँग्रेस पक्षाला जाग आलेली आहे. आग लागली आहे, ती बुडाशी आलेली आहे, याची जाणीव झाल्यावर लगेचच काँग्रेस नेत्यांनी विहीर खणायला सुरूवात केली.

काँग्रेस नेते आता द्रमुक नेत्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. आपल्या परिवाराने देशावर राज्य केले आहे, हा अहंकार सोनिया गांधी यांच्यात आहे. राहुल गांधी आणि प्रियांका यांच्यात तर तो ठासून भरला आहे. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला काडीचीही किंमत नसल्याचा त्यांचा एकूण अविर्भाव असतो. पक्षाच्या खासदाराला, प्रवक्त्याला सफेद बालवाला म्हणणाऱ्या सोनिया गांधी काय किंवा दोन दशके सोबत असलेल्या पक्षाच्या नेत्यांना एट्टाप्पन अर्थात गद्दार म्हणणारे राहुल गांधी काय, सगळे एका माळेचे मणि.

तामिळनाडूमध्ये विधानसभेचे निकाल टीव्हीपीच्या बाजूने लागलेत असे दिसताच, राहुल गांधी यांनी झुरळ झटकावे तसे द्रमुकला झटकून टाकले. परंतु आता चार महिन्याच्या आत त्याच द्रमुकची मनधरणी करण्याची, त्यांच्यासमोर सरपटण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आलेली आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह थिरु एम.के.स्टॅलिन यांना भेटायला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. थिरुचा तमिळ भाषेतील अर्थ भाऊ. राहुल गांधी यांना चार महिन्यांनंतर भाऊ आठवला आहे. ‘लोकसभेच्या जागा ८५० झाल्यास देशातील लोकशाही संपुष्टात येईल. संघ आणि भाजपाला देशातील राजकीय नकाशा त्यांच्या सोयीप्रमाणे वापरण्याची मोकळीक मिळेल. तामिळनाडूचे हित, देशहित आणि संविधानाच्या रक्षणासाठी स्टॅलिन नेहमीच उभे राहिले. आपण एकत्रितपणे ही विधेयके हाणून पाडू.’ अशीही पोस्ट आहे.

हे ही वाचा:

हेल्मेटला चेंडू आदळल्यामुळे आकाश दीपऐवजी प्रसिद्ध कृष्णा मैदानात

‘आप’चा चौथा आमदार अकाली दलाच्या गोटात!

कॅलिफोर्नियात ५.० तीव्रतेचा भूकंप; ४० हून अधिक धक्के

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

स्टॅलिन यांनी त्याला उत्तर दिले आहे. ‘आम्ही प्रत्येक निर्णय तामिळनाडू आणि तमिळींच्या हितासाठी घेतलेला आहे. आम्ही तडजोड करणार नाही. इतिहास आम्हाला ‘कट्टाबोम्मन’ म्हणून लक्षात ठेवेल ‘एट्टाप्पन’ म्हणून नाही. हे दोन्ही शब्द तमिळ इतिहासातील आहेत. ‘कट्टाबोम्मन’ हा ब्रिटीशांच्या विरोधात लढलेला एक देशभक्त सरदार आहे. तर ‘एट्टाप्पन’ हा ब्रिटीशांसाठी गद्दारी कऱणारा तिथला सुर्याजी पिसाळ आहे.

स्टॅलिन जे काही म्हणाले, त्याला १ ऑगस्ट रोजी महाबलिपुरम येथे राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ आहे. ‘डीलिमिटेशन विधेयकाला पाठींबा देणारे २१ व्या शतकातील एट्टाप्पन आहेत’, असे ते म्हणाले होते. तेव्हा संसदेत हे विधेयक फेटाळले गेले होते, द्रमुकने त्याला विरोध केला होता. परंतु भविष्यात या विधेयकाबाबत द्रमुकची भूमिका बदलू शकते असे संकेत मिळू लागले होते. तेव्हा राहुल गांधी यांनी हे विधान केले होते. याचा अर्थ त्यांचा निशाणा थेट द्रमुककडेच होता. स्टॅलिन यांनी आज केवळ राहुल यांच्या पोस्टला उत्तर दिलेले नाही. त्यांनी १ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचाही खणखणीत प्रतिवाद केलेला आहे.

राहुल गांधी यांची एक खासियत आहे. आपली पापं त्यांना दिसत नाहीत. इंदिरा गांधी यांनी देशावर लावलेल्या आणीबाणीबाबत ते बोलत नाहीत, मोदींवर हुकूमशहा असल्याचा आरोप करत असतात. तामिळनाडूतील चवली पावलीच्या मंत्रीपदांसाठी त्यांनी दोन दशके सोबत असलेल्या द्रमुकला पूर्णपणे अंधारात ठेवून टीव्हीकेची साथ केली. आपण युती तोडत असल्याची कल्पना देण्यासाठी स्टॅलिन यांना साधा फोन कऱण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. तरीही ते स्वत:ला एट्टाप्पन न म्हणवता, दुसऱ्यालाच हे बिरुद चिटकवतात. उद्धव ठाकरे काय किंवा राहुल गांधी काय, दोघांतला हा समान गुण आहे. हे दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा सगळे छान छान असते आणि तोच खंजीर जेव्हा यांच्या पाठीत खुपसला जातो तेव्हा हे अफजलखानासारखे दगा दगा म्हणून ओरडतात.

कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नेहमीची कॅसेट वाजवली आहे. लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवणे म्हणजे लोकशाही नष्ट करणे, हे विधेयक संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, एससी-एसटी विरोधी आहे. भाजपा संविधान बदलणार हा खुळखुळा एकदा वाजवून यश मिळवले. सारखे सारखे मिळणार नाही. इंडिया आघाडीतील पक्षच यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. द्रमुकसारखा जुना मित्र पक्ष राहुल गांधी यांच्या खंजीराचा धसका घेऊन बाजूला झाला, शरद पवार दूर झाले. उरलेले कधी सरकतील याचा नेम नाही. राहुल गांधी यांचा शाही माज ठाऊक असल्यामुळे अखिलेश यादव त्यांना नेहमी त्यांची जागा दाखवत असतात. उत्तर प्रदेशात जागावाटपाच्या निमित्ताने हेच चित्र दिसते आहे.

राहुल गांधी आता शरद पवार आणि स्टॅलिन यांना भेटायला जाणार आहेत. पवार यांची प्रकृती बरी नसताना ते अनेकदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले असताना राहुल गांधी किंवा त्यांच्या इटालियन मातोश्री सोनिया गांधी यापैकी कोणीही त्यांना फोन केला नाही, त्यांची विचारपूस केली नाही. ती विचारपूस केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. सोनिया तर शरद पवारांचा आतून प्रचंड द्वेष करतात. मित्रांना शत्रूसारखी वागणूक देणारे आता त्यांचे मन वळवण्याचा प्रय़त्न करतायत.

एका बाजूला काँग्रेसवाल्यांच्या दिल्लीश्वरांचे मिशन मिनतवारी चालले असतात. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पवार आणि स्टॅलिन यांच्याविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. विधेयकाला पाठिंबा देण्याचा द्रमुकचा निर्णय ही ऐतिहासिक चूक असून शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्रातून साफ होईल, असे विधान कवडी दमडीच्या इम्रान मसूदने केले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते शरद पवारांना गद्दार घोषित करून मोकळे झाले आहेत. राहुल गांधी आता त्या गद्दारांची समजूत काढण्यासाठी येत आहेत. शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. राहुल गांधी म्हणाले की त्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर ते इंडिया आघाडीत राहतील ही पश्चात बुद्धी आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा