30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषहुंड्यात थारची मागणी, मुलीच्या कुटुंबीयांनी दिली खेळण्यातील गाडी

हुंड्यात थारची मागणी, मुलीच्या कुटुंबीयांनी दिली खेळण्यातील गाडी

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हुंड्याच्या मागणीवरून घडलेली एक अनोखी घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. लग्न ठरवताना मुलाकडील मंडळींनी हुंड्यात महिंद्रा थार ही महागडी एसयूव्ही देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, या मागणीला बळी न पडता मुलीच्या कुटुंबीयांनी चक्क खेळण्यातील थार गाडी देऊन मुलाकडील मंडळींना अनोख्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे, तर याच वेळी लग्नाचे नातेही मोडण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील ज्ञानपूर गावातील शमशेर यांनी आपल्या मुलाचे लग्न सोलाना गावातील एका तरुणीशी निश्चित केले होते. शनिवारी लग्नातील पारंपरिक ‘लाल खत’ या विधीसाठी शमशेर आपल्या मुलाची चिठ्ठी घेऊन नातेवाईकांसह मुलीच्या घरी पोहोचले होते. यावेळी लग्नाच्या चर्चेदरम्यान मुलाकडील मंडळींनी हुंड्यात महिंद्रा थार गाडीची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी जमीन विकल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हे ही वाचा:
दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

मुलाकडील मंडळींच्या मागणीला थेट विरोध करण्याऐवजी मुलीच्या कुटुंबीयांनी वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत मुलाकडील नातेवाईकांना घरी थांबवून ठेवले. त्यानंतर रात्री त्यांच्या समोर खेळण्यातील प्लास्टिकची थार गाडी आणून ठेवली. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीच्या बाजूची व्यक्ती, ‘तुम्हाला मुलगी नको होती, तर गाडी हवी होती. म्हणून आम्ही तुम्हाला गाडी दिली आहे,’ अशा शब्दांत मुलाकडील मंडळींना सुनावताना दिसते. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न मोडण्याचा निर्णय जाहीर केला. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मुलीच्या कुटुंबीयांच्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात आहे. लग्नासारख्या पवित्र नात्याला पैशांचे आणि महागड्या वस्तूंचे व्यवहार बनवण्याच्या मानसिकतेवर नागरिकांनी टीका केली आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही समाजात अशा मागण्या होत असल्याने हुंडा प्रथेचे सामाजिक वास्तव पुन्हा समोर आले आहे. मेरठमधील या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की, मुलीचे लग्न म्हणजे तिच्या कुटुंबाने आर्थिक ओझे उचलण्याची जबाबदारी नाही. विवाहाचे नाते हे परस्पर सन्मान, विश्वास आणि समानतेवर उभे राहायला हवे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा