भारत श्री आणि कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी ‘योद्धा’ या पुस्तकाच्या माध्यमातून आता उपलब्ध झाली आहे. एक क्रीडापटू म्हणून पेणकर यांची ही कारकीर्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
पत्रकार संदीप चव्हाण यांनी लिहिलेल्या आणि सदामंगल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात पेणकर यांच्या क्रीडाक्षेत्रातील स्फूर्तीदायक कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.
माझगावच्या सर एली कदुरी शाळेतील प्रांगणात हा सोहळा रंगला. या सोहळ्यास व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार शशिकांत शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, इंडियन ज्युईश फेडरेशनचे अध्यक्ष जोनाथन सॉलोमन, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, आयोजक राल्फ पेणकर तसेच अनेक अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते.
विजू पेणकरांसारख्या कबड्डीतील अनेक दिग्गज खेळाडूंच्या आठवणी दृष्यमाध्यामात जतन केल्यास येणार्या पिढीस त्या मार्गदर्शक ठरतील. कबड्डी संघटनेने यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी लेखक संदीप चव्हाण यांनी केली.
आपल्या प्रत्येकाचा रोज जगण्यासाठी संघर्ष असतो. या संघर्षात जिथे तुमची हिंमत संपेल असे वाटेल त्या प्रत्येक अवघड वळणावर योद्धा हे पुस्तक तुम्हाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे विजू पेणकर यांनी सांगितले. या पुस्तकासाठी पन्नास वर्षापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती आणि फोटो संकलित करणे अवघड होते. तब्बल दोन वर्ष त्यासाठी मेहनत घेतली. गरिबीचे चटके सोसून, अनेक संकटांचा मुकाबला करत यश मिळवणाऱ्या पेणकरांचे हे खेळ चरित्र अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला.
विजू सारखा शिष्य लाभणे हा मी माझा गौरव समजतो, अशा शब्दात मधुकर तळवलकर यांनी विजू पेणकर यांचा गौरव केला. विजूचा खेळातील थरार लेखक संदीप चव्हाण यांनी अचूक शब्दात पकडला आहे. त्यासाठी त्यांनी दोन वर्ष खडतर मेहनत घेतली, हे पुस्तकाच्या पानापानातून दिसते आहे, असेही तळवलकर यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
राणीच्या बागेत मांसाहार नको; शिवसेनेची भूमिका
पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’
उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी
अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ
भारतातील ज्यू समाजाला राष्ट्रीय पातळीवर विजू पेणकर यांनी आपल्या खेळाने गौरवास्पद उंची गाठून दिली त्याबद्दल ज्यू समाज सदैव त्यांचा ऋणी राहील असे भारतीय ज्युईश संघटनेचे अध्यक्ष सॉलिसीटर जोनाथन सॉलोमन यांनी यावेळी म्हटले. सदामंगल प्रकाशनाने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निर्मिती केलीय. पण योद्धा हे पहिलेच खेळावरील पुस्तक आहे. त्याला चांगाला प्रतिसाद मिळेल, अशी आशा प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केली. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन लेबाना पेणकर यांनी केले.







