पेट्रोल, डिझेलचा भाव कमी; गॅस सिलेंडरवर सबसिडी
देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरावरून चर्चा सुरू असतानाच यांसंदर्भातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केला आहे. तसेच पहिल्या बारा घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवरील प्रति लिटर आठ रुपये आणि डिझेलवरील प्रति लिटर सहा रुपये कमी केला आहे. यामुळे पेट्रोल साडे नऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे केंद्र सरकारवर सुमारे एक लाख कोटी वर्षाकाठी भार पडणार आहे. हा नियम १ जून पासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या देशात पेट्रोल प्रति लिटर १२० रुपयांवर आहे आणि डिझेल प्रति लिटर १०५ रुपयांवर आहे. केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्याने हे दर कमी होणार आहेत. मात्र, ज्या राज्यात राज्याचा कर जास्त आहे तिथे याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. केंद्राने अनेक वेळा सांगूनही अनेक राज्यांनी वॅट कमी केलेला नाही यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे महराष्ट्रात केंद्राने उत्पादन शुल्क कमी केले तरी पेट्रोल डिझेलच्या भावात तितकासा फरक पडणार नाही.
हे ही वाचा:
लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही केंद्राने दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत नऊ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी दिली आहे. पहिल्या बारा गॅस सिलेंडरवर ही सबसिडी असणार आहे. यामुळे वर्षाला सुमारे ६ हजार १०० कोटींचा केंद्र सरकावर भार पडणार आहे.







