ग्रेटा थनबर्ग हीने ट्वीट केलेल्या टुलकिटची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी चालू असतानाच या टुलकिटची लिंक थेट पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय सोबत लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?
भारताच्या प्रजासत्ताक दिनाला मोठा हिंसाचार दिल्लीत उफाळला. त्यानंतर थोड्याच दिवसात स्वीडनची शाळकरी मुलगी ग्रेटा थनबर्ग हीने केलेल्या ट्वीटरसोबत जोडलेल्या टुलकिटमध्ये पीटर फ्रेडरिक याचे नाव कसे झळकले याचा पोलिस तपास करत आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी पीटर याचे संबंध आहेत असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. त्याशिवाय दिल्लीत २६ जानेवारी रोजी उफाळलेल्या हिंसाचाराशी त्याचा नेमका कसा संबंध आहे, याचा देखील तपास केला जाणार आहे.
पोलिसांनी सांगितले आहे की टुलकीट भारताबद्दल चुकीची माहिती पसरवण्यासाठी तसेच भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि सामाजिक तेढ पसरवण्यासाठी तयार करण्यात आले होते.
या टुलकिटमध्ये नाव असलेला पीटर हा तपास यंत्रणेच्या रडारवर २००६ पासून असल्याचे देखील कळले आहे. पीटर हा आयएसआयच्या काश्मिर- खालिस्तान समर्थक इक्बाल चौधरी याचा हस्तक भजन सिंग भिंदर याच्याशी संबंध ठेवून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ज्या टुलकिटमधून ही माहिती उघड झाली होती, ते ट्वीट ग्रेटाने नंतर डिलीट केले होते आणि नव्या ‘सुधारित’ टुलकिटसह नवे ट्वीट केले होते.