38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेष...हे म्हणजे आपल्या गल्लीत वाघ ठरण्यासारखे!

…हे म्हणजे आपल्या गल्लीत वाघ ठरण्यासारखे!

एकनाथ शिंदेंनी माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावं : आदित्य ठाकरे

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर आदित्य ठाकरे या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा देताना दिसत आहेत. एवढे दिवस उलटूनही सत्ता गेल्याचा राग आदित्य ठाकरेंचा काही कमी होताना दिसत नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमात, पत्रकारांसमोर ते बोलून दाखवताहेत, आव्हान देताहेत. आता आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदेंनी माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावं अशा शब्दांत एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटले आहेत.

आदित्य यांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने वरळी हा सुरक्षित मतदारसंघ तयार केला होता. २०१४ साली या मतदार संघातून सुनील शिंदे विजयी झाले होते. तसंच १९९० पासून २००४ पर्यंत सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत सामील केले गेले. सुनील शिंदे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यांना त्या बदल्यात विधान परिषदेतील आमदारकी बहाल केली गेली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील वरळीच्याच. सचिन अहिर यांना शिवसेनेत घेऊन आयत्यावर कोयता मारून आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले. ते निवडणूक जिंकणार हे आधीच स्पष्ट झालं. सचिन अहिर यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद आदित्य ठाकरेंमध्ये नव्हती का. सर्व काही सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्यानंतर आदित्य ठाकरे निवडणुकीला सामारे गेले आणि निवडून आले.

आता याच सुरक्षित मतदारसंघातून आपल्याविरोधात उभे राहून दाखवावे असे आव्हान आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देताहेत. खरे तर त्यांना शिंदेंविरोधात निवडणूक लढवायचीच असेल आणि हिंमत दाखवायचीच असेल तर आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या ठाण्यात, त्यांच्या गडात जाऊन निवडणूक लढवल्यास ते खऱ्या अर्थाने आव्हान दिल्यासारखे होईल. ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्लाही आहे. मग आदित्य तिथे जाऊन निवडणूक का लढवणार नाहीत? आव्हान देणं याला म्हणतात. तुम्ही माझ्या मतदारसंघात या आणि मला आव्हान द्या, अशी भाषा आव्हान देणाऱ्याची नसते. तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन मी तुम्हाला पराभूत करीन ही आव्हानाची भाषा असते. नवरात्रीच्या काळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या टेंभीनाक्याला भेट दिली होती. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आल्याचे कौतुक झाले होते. मग तिथेच खरे तर शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिले पाहिजे.

आदित्य ठाकरे ज्या ब्रांद्यात राहतात, त्या ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. त्याचे कारण कळले नाही. त्याऐवजी त्यांनी वरळी गाठली. याच वांद्रे येथे प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्या सहानभूतीवर त्या जिंकूनही आल्या. दुसऱ्या वेळेस मात्र त्यांचे तिकीट कापले गेले. तत्कालिन महापौर महाडेश्वर यांना तिकीट दिले गेले. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंड केले. त्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यावेळेस माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा दणदणीत पराभव झाला. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. ‘मातोश्री’चा गड हातचा गेला. आदित्य ठाकरे यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये ही अवस्था. ठाकरे कुटुंबियांनी महाडेश्वर यांना मत दिले, पण ते त्यांना निवडून आणू शकले नाहीत आणि आता मात्र वरळीत येऊन आपल्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आहेत.

आदित्य ठाकरे यांनी याबाबतीत स्मृती इराणी यांचा आदर्श बाळगला पाहिजे.

अमेठी हा गांधी कुटुंबाचा गड होता. वर्षानुवर्षे काँग्रेसचीच तिथे सत्ता राहिली होती. पण स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाच्या गडावर जाऊन निवडणूक लढविली. स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाला आव्हान दिले नाही, की माझ्या सुरक्षित मतदारसंघात या आणि निवडणूक लढवा. मी राहुल गांधींना हरवते म्हणून. त्या स्वतः गांधी कुटुंबांच्या गडावर जाऊन लढल्या. पहिल्या वेळेस त्यांना विजयाने हुलकावणी दिली. आपण राहुल गांधींना हरवू शकतो असा त्यांना पहिल्या निवडणूकीत अंदाज आल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्या पुन्हा लढल्या. राहुल गांधींना त्यांनी पराभूत केले. नाइलाजाने राहुल गांधींना पळून केरळच्या वायनाडमध्ये आसरा शोधावा लागला. याला म्हणतात आव्हान. आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले असते की, मी राजीनामा देतो आणि तुमच्या ठाण्यात येऊन निवडणूक लढवतो तर त्याचे कौतुक झाले असते. माझगाव हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण  त्याच भुजबळांना त्यांच्याच शिष्याने बाळा नांदगावकर यांनी हरवलं होतं. नांदगावकर खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले होते. भुजबळ हे माजी महापौर, शिवसेनेचे मोठे नेते, पहिले निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अशा व्यक्तीला त्यांच्या गडावर हरवणं कठीण होतं, पण नांदगावकर यांनी ते करून दाखवलं, याला म्हणतात आव्हान.

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज आदित्य ठाकरे म्हणताहेत, मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन माझ्याशी चर्चा करावी. तिथेही ते आपण कुणीतरी श्रेष्ठ नेता आहोत आणि एकनाथ शिंदे हे फुटकळ नेते असल्याचा दावा करतात. पण खरोखरच त्यांना अशी चर्चा करायची असेल तर त्यांनी वर्षावर जावे आणि एकनाथ शिंदेंना हवे ते प्रश्न विचारावेत.  अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांना विचारा प्रश्न. पण तिथे मात्र या डरकाळ्या नसतात. मग हे सर्व मीडियात चर्चा व्हावी म्हणून असते की काय?

आदित्य ठाकरे ज्या वरळीत सहजसोप्या पद्धतीने निवडून आले तिथे अशा सुरक्षित मतदारसंघात शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता निवडून येऊ शकला असता. आव्हान देताना विपरित, प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हाच खरी मजा येते. आता असे आव्हान आदित्य ठाकरे खरोखरच देऊ शकतील का की केवळ ते शब्दांचे बुडबुडेच ठरणार?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा