32 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरबिजनेस२१ ऑक्टोबरला खुला होणार जिओचा आयपीओ!

२१ ऑक्टोबरला खुला होणार जिओचा आयपीओ!

३७ हजार ७०० कोटींचा मेगा इश्यू लवकरच बाजारात

Google News Follow

Related

मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहातील जिओ प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतीक्षित आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. सुमारे ३.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ३७ हजार ७०० कोटी रुपयांचा हा आयपीओ असण्याची शक्यता असून, तो भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. उपलब्ध माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ २१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तर २८ ऑक्टोबरला कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. मात्र, या तारखांवर अंतिम शिक्कामोर्तब कंपनीकडून अधिकृत घोषणा आणि आवश्यक नियामक मंजुरीनंतरच होईल.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओकडे देशातील किरकोळ गुंतवणूकदारांसह मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे. आयपीओच्या तयारीला कंपनीने वेग दिला असून, देशाबरोबरच परदेशातील गुंतवणूकदारांशीही चर्चा सुरू केली आहे. अमेरिका, ब्रिटन, दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूर या प्रमुख आर्थिक केंद्रांमध्ये कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी रोडशो आयोजित करण्यात आले. या रोडशोच्या माध्यमातून जिओ प्लॅटफॉर्म्सचा व्यवसाय, कंपनीच्या भविष्यातील योजना आणि संभाव्य मूल्यांकन याबाबत गुंतवणूकदारांना माहिती देण्यात आली. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी आणि रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
सोरोस याच्याकडून निधी मिळालेल्या सीएआयआरवर ‘दहशतवादी’ शिक्का

‘गाझाचा बदला’ घेण्यासाठी विमान पाडण्याचा कट

सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान-तुर्कीचे सैन्य होणार तैनात

ज्ञानेश कुमार विरोधाची ही कारणेही लक्षात घ्या… |

जिओ प्लॅटफॉर्म्सकडून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे म्हणजेच सेबीकडे आयपीओशी संबंधित अंतिम कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १९ ऑक्टोबरला मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अँकर बुक सुरू होऊ शकते. २१ ऑक्टोबरला सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ खुला होऊन २३ ऑक्टोबरला तो बंद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबरला शेअर वाटपाची प्रक्रिया होऊ शकते आणि २८ ऑक्टोबरला जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या आयपीओचे संभाव्य मूल्यांकनही मोठे आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे मूल्यांकन सुमारे १४३ ते १४६ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय रुपयांमध्ये हे मूल्यांकन जवळपास १२ लाख कोटी रुपयांच्या आसपास जाऊ शकते. त्यामुळे जिओचा आयपीओ केवळ आकारानेच मोठा ठरणार नाही, तर कंपनीच्या प्रचंड बाजारमूल्यामुळेही तो चर्चेचा विषय ठरणार आहे.

सध्या भारतातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुंदाई मोटर इंडिया कंपनीच्या नावावर आहे. २०२४ मध्ये हुंदाईने सुमारे २.९ अब्ज डॉलरचा आयपीओ आणला होता. जिओ प्लॅटफॉर्म्सचा प्रस्तावित आयपीओ प्रत्यक्षात आला तर हा विक्रम मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय प्राथमिक बाजारासाठी जिओचा आयपीओ ऐतिहासिक ठरू शकतो.
जिओ प्लॅटफॉर्म्सचा व्यवसाय केवळ मोबाईल आणि इंटरनेट सेवांपुरता मर्यादित नाही. डिजिटल सेवा, क्लाउड, कृत्रिम बुद्धिमत्ता, उद्योगांसाठी डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांत कंपनीचा विस्तार झाला आहे. त्यामुळे भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा फायदा कंपनीला भविष्यात मिळू शकतो, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर रिलायन्स जिओच्या व्यवसायाशी संबंधित कर्ज कमी करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनेही हा आयपीओ महत्त्वाचा मानला जात आहे. आता जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ नेमक्या कोणत्या किंमतीला येतो, कंपनीचे अंतिम मूल्यांकन किती ठरते आणि गुंतवणूकदारांकडून त्याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा