अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मेगा विस्तार

₹२ लाख कोटींची गुंतवणूक, वीज उत्पादनात मोठी वाढ

अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मेगा विस्तार

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात पुढील दशकाचा चेहरामोहरा बदलू शकणारी सर्वात मोठी खासगी गुंतवणूक जाहीर करत अदानी पॉवरने तब्बल ₹२ लाख कोटींच्या मेगा विस्तार योजनेची घोषणा केली आहे. देशातील वाढत्या वीज मागणीचा अंदाज घेत कंपनीने आपली वीज निर्मिती क्षमता सध्याच्या १८,१५० मेगावॅटवरून जवळपास ४१,८७० मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. म्हणजेच पुढील काही वर्षांत अदानी पॉवरची क्षमता तब्बल २३,७२० मेगावॅटने वाढणार असून ती आजच्या तुलनेत दुपटीहून अधिक होणार आहे.

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या या महायोजनेत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसामसह विविध राज्यांमध्ये नवीन अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारले जाणार आहेत. बिहारमधील २,४०० मेगावॅटच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पापासून अनेक नव्या ऊर्जा प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळण्याबरोबरच हजारो प्रत्यक्ष आणि लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
इराणी तेलाचे दरवाजे खुले

विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या ‘कमांड’वर नियुक्ती

इराणमध्ये परिस्थिती सुधारतेय, पण सावध राहा!

बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीविरुद्धचा १०० कोटींचा खटला जिंकला

भारताची पीक वीज मागणी सध्या २५० गिगावॅटच्या आसपास पोहोचली असून २०३१-३२ पर्यंत ती ४०० गिगावॅट आणि २०४७ पर्यंत ७०० गिगावॅटच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. वाढते शहरीकरण, वेगाने वाढणारे डेटा सेंटर, इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उद्योग आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ यामुळे देशाला प्रचंड प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी समूहाने ऊर्जा क्षेत्रातील सर्वात आक्रमक विस्तार धोरण स्वीकारले आहे.

विशेष म्हणजे हा विस्तार केवळ कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्पांपुरता मर्यादित राहणार नाही. अदानी समूहाने २०३५ पर्यंत १० गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचेही महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यासाठी स्वतंत्र अणुऊर्जा व्यवसाय उभारला जाणार असून भारतातील खासगी क्षेत्रातील अणुऊर्जा गुंतवणुकीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.

ऊर्जा क्षेत्रासोबतच ट्रान्समिशन, नवीकरणीय ऊर्जा, गॅस वितरण, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. समूहाची एकूण पायाभूत सुविधा गुंतवणूक पुढील काही वर्षांत लाखो कोटी रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. अदानी समूहाच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवरून १० ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असताना ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक ही विकासाचा सर्वात मोठा आधारस्तंभ ठरणार आहे.

₹२ लाख कोटींच्या या मेगा गुंतवणुकीमुळे अदानी पॉवर केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खासगी वीज उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू झालेली ही शर्यत आगामी दशकात भारतीय ऊर्जा क्षेत्राचे संपूर्ण समीकरण बदलू शकते.

Exit mobile version