सोने-चांदीच्या दरातील घसरणीचा सिलसिला आजही कायम राहिला असून २४ जून रोजी मौल्यवान धातूंना पुन्हा मोठा फटका बसला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये एकत्रितपणे ₹४,००० हून अधिक घसरण नोंदवली गेली. मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता आणि जागतिक बाजारातील कमकुवत मागणी यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीपासून काही प्रमाणात अंतर ठेवले आहे.
आज देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹१,४४,३०० प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,३२,३०० प्रति १० ग्रॅमच्या आसपास राहिला. चांदीच्या किमतीतही मोठी घसरण होत ती ₹२.३३ लाख प्रति किलोच्या खाली आली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विक्रीमुळे चांदीत सात दिवसांत जवळपास ₹२५,००० प्रति किलोची घसरण झाल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
ट्रिलिनेयर क्लबमधून बाहेर पडले इलॉन मस्क
नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून तरुणाला चाकूने मारले
अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मेगा विस्तार
विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या ‘कमांड’वर नियुक्ती
विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातील उच्चांकाच्या तुलनेत सोने सुमारे २४ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. चांदीची स्थितीही कमकुवत असून तीही मोठ्या प्रमाणावर दबावाखाली आहे. अमेरिकेत व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकतात, अशा संकेतांमुळे डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाल्यास सोन्यातील गुंतवणूक तुलनेने महाग ठरते आणि त्यामुळे जागतिक स्तरावर मागणी कमी होते. याचाच परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, जयपूर आणि बंगळुरूसह प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी असली तरी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हची पुढील भूमिका आणि डॉलरची दिशा यावर पुढील काही आठवड्यांत सोन्या-चांदीची वाटचाल अवलंबून राहणार आहे.
एकूणच, सलग तिसऱ्या सत्रात झालेल्या घसरणीमुळे सोने आणि चांदीचा बाजार दबावाखाली आला असून गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचे संकेत बाजारातून मिळत आहेत.
