मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आल्यानंतर भारतीय उद्योगसमूह आदाणी समूह यांच्या ताब्यातील हाइफा बंदर सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कंपनीने स्पष्ट केले की बंदरातील सर्व मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इस्रायलमधील काही भागांवर क्षेपणास्त्र हल्ले झाले. तेल अवीवसह काही शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हाइफा परिसरातील औद्योगिक आणि बंदर क्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
हे ही वाचा:
अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अलिरेझा अराफी इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते
नागपूर काटोल औद्योगिक परिसरात भीषण स्फोट
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक बाजारात खळबळ
अफगाणिस्तानातील इस्त्रायली फूटप्रिंट्सचे पाकिस्तानला भय
मात्र आदाणी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड या कंपनीने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की हाइफा बंदरावर कोणताही थेट परिणाम झालेला नाही. सर्व टर्मिनल, कंटेनर यार्ड, क्रेन आणि लॉजिस्टिक सुविधा सुरळीत सुरू आहेत. कंपनीने सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवला असून इस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाशी समन्वय साधला जात आहे. कर्मचारी आणि जहाजांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
हाइफा बंदर हे इस्रायलच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. देशाच्या सुमारे ३० टक्क्यांहून अधिक आयात-निर्यात व्यवहार या बंदरातून होतात. त्यामुळे येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने व्यापारात अडथळा आलेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आदाणी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडने २०२३ साली इस्रायलस्थित गॅडोट समूह यांच्यासोबत संयुक्त उपक्रमातून हाइफा बंदराचे खासगीकरण प्रक्रियेत अधिग्रहण केले होते. या व्यवहाराची किंमत सुमारे १.१८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. या बंदरात आदाणी समूहाची बहुसंख्य भागीदारी आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असली तरी हाइफा बंदराचे कामकाज सुरळीत असल्याने भारतासह अनेक देशांच्या व्यापारसाखळीला दिलासा मिळाला आहे. कंपनीने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्यातरी या संघर्षाचा आदाणी समूहाच्या इस्रायलमधील प्रकल्पांवर थेट परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.







