“भारताला आता आरोग्याच्या क्षेत्रात उत्क्रांती नव्हे, तर क्रांतीची गरज आहे,” असे ठाम मत उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केले. मुंबईतील आघाडीच्या सोसायटी फॉर मिनिमली इनव्हेसिव्ह स्पाइन सर्जरी – आशिया पॅसिफिक(एसएमआयएसएस-एपी) च्या 5 व्या वार्षिक संमेलनामध्ये बोलताना डॉक्टरांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला सलाम केला. त्यांनी भारताच्या आरोग्य व्यवस्थेतील उणीवांकडे लक्ष वेधले आणि आपल्या कुटुंबातर्फे ₹६०,००० कोटींच्या “अदानी हेल्थकेअर टेम्पल्स” या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली.
अदानी म्हणाले, “आरोग्य क्षेत्र पुरेसे पुढे गेलेले नाही; म्हणून आम्ही पुढे येत आहोत. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आरोग्य सेवा ही केवळ गरज नसून ती राष्ट्रीय सक्षमतेचा पाया आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारत आज ‘स्पायनल एपिडेमिक’चा सामना करत आहे. पाठदुखी ही देशात अपंगत्वाची प्रमुख कारणं बनली आहेत. जर आपले नागरिकच उभे राहू शकले नाहीत, तर भारत उभा कसा राहील?”
या वक्तव्याच्या माध्यमातून अदानी यांनी केवळ भव्य प्रकल्पाची घोषणा न करता, त्यामागील सामाजिक दृष्टीकोनही स्पष्ट केला. “ही स्पर्धा नाही, ही सामाजिक जबाबदारी आहे. आमचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील कमतरता भरून काढण्याचा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या गुंतवणुकीअंतर्गत ‘अदानी हेल्थकेअर टेम्पल्स’ या नावाने 1000 खाटांची एकात्मिक रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. प्रारंभी मुंबई आणि अहमदाबाद येथे हे रुग्णालय प्रकल्प साकारले जातील. या रुग्णालयांचे डिझाईन जगप्रसिद्ध अमेरिकन मेयो क्लिनिक यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये केवळ उपचारच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधून जागतिक दर्जाचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया प्रणाली, ग्रामीण मोबाइल थिएटर्स आणि स्केलेबल आरोग्य सुविधा असतील.
गौतम अदानींच्या या विधानामुळे भारतात खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवेला नवा दिशा आणि वेग मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या ‘आरोग्य क्रांती’चा आरंभ आजपासून झाला असल्याचेच मानले जात आहे.







