जागतिक आर्थिक मंदी, युद्धजन्य परिस्थिती आणि अनेक देशांतील व्यापारातील अनिश्चितता यामध्ये भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीने आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम नोंदवत ८६३.११ अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ ४.५९ टक्के इतकी आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताची एकूण निर्यात ८२५.२६ अब्ज डॉलर इतकी होती. यंदा त्यात जवळपास ३८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील दबाव आणि अनेक देशांमधील आर्थिक अडचणी असूनही भारताने निर्यातीमध्ये सातत्याने वाढ कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
हे ही वाचा:
“भारताची प्रतिक्रिया दहशतवाद विरोधात ठाम आणि अचूक!”
हवाई दल ते स्वीय सहाय्यक… कोण होते सुवेंदू अधिकारी यांचे पीए?
पश्चिम बंगालमध्ये नवनिर्वाचित भाजप आमदाराच्या भावाची हत्या
इसिस रिसिन बायोटेरर प्रकरण: विष देऊन मोठ्या प्रमाणावर हानी करण्याची होती योजना
या विक्रमामागे सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा राहिला आहे. आयटी सेवा, डिजिटल सेवा, बिझनेस कन्सल्टिंग आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सेवांना जगभरातून मोठी मागणी मिळाल्याने सेवा निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. २०२४-२५ मध्ये भारताची सेवा निर्यात ३८७.५५ अब्ज डॉलर होती. ती यंदा वाढून ४२१.३२ अब्ज डॉलरवर पोहोचली. म्हणजेच सेवा निर्यातीत तब्बल ८.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारताची आयटी आणि डिजिटल क्षेत्रातील मजबूत पकड या वाढीमागचे मुख्य कारण मानले जात आहे.
वस्तू निर्यातीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वस्तू निर्यात ४४१.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली. मागील वर्षी ती ४३७.७० अब्ज डॉलर होती. म्हणजेच वस्तू निर्यातीत जवळपास ४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ कमी असली तरी जागतिक व्यापारातील मंदी लक्षात घेता ती सकारात्मक मानली जात आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, भारताने गेल्या वर्षभरात दररोज सरासरी २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची निर्यात केली. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला जवळपास १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तू आणि सेवा भारतातून जगभरात पाठवण्यात आल्या. भारतीय उत्पादनांवर आणि सेवांवर जगभरातील ग्राहकांचा वाढता विश्वास या आकडेवारीतून स्पष्ट दिसून येतो.
दरम्यान, निर्यातीसोबत भारताची आयातही वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशाची एकूण आयात ९७९.६५ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यामुळे व्यापार तूट कायम आहे. मात्र सेवा क्षेत्रातून मिळणारे मोठे उत्पन्न भारतासाठी दिलासादायक ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारत आता पारंपरिक उत्पादनांपेक्षा सेवा-आधारित अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल टेक्नॉलॉजी, आयटी सेवा आणि स्टार्टअप क्षेत्रातील वाढ भारताला जागतिक बाजारात अधिक मजबूत बनवत आहे. आगामी काळातही सेवा क्षेत्राचा वेग कायम राहिला, तर भारताची निर्यात आणखी मोठी झेप घेऊ शकते.
