भारताचा मोबाइल फोन निर्यात उद्योग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. मात्र पश्चिम आशियातील इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे या वाढीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या युद्धामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल फोन निर्यातीला सुमारे २ ते ३ अब्ज डॉलर्सपर्यंत नुकसान होऊ शकते. माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने मोबाइल फोन निर्यातीतून सुमारे ११ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवला होता. परंतु इराण युद्धामुळे खाडी प्रदेशातील व्यापार, मालवाहतूक आणि ग्राहक मागणीवर परिणाम होत असल्याने निर्यातीचे प्रमाण घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
१ एप्रिलपासून टोल प्रवास महागणार
‘जॉब हॉपिंग’चा वाढता ट्रेंड; कर्मचारी टिकवण्यासाठी कंपन्यांवर वाढला दबाव
अमेरिकेचा ‘यू व्हिसा’ मिळवण्यासाठी ११ भारतीयांनी टाकला बनावट दरोडा
इंडिगोचा मोठा निर्णय; आजपासून उड्डाणांवर ₹४२५ ते ₹२,३०० इंधन अधिभार
विशेषतः खाडी आणि पश्चिम आशियातील देश हे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी महत्त्वाचे बाजार मानले जातात. मोबाइल फोन उत्पादन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) कंपन्यांची या प्रदेशावर मोठी अवलंबित्व आहे. त्यामुळे या भागातील संघर्षाचा परिणाम थेट भारतीय कंपन्यांवर होत आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या विश्लेषकांनी सांगितले की, इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षामुळे पश्चिम आशियातील बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोबाइल फोन हा सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या वस्तूंमध्ये समाविष्ट झाला आहे.
व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५ आर्थिक वर्षात खाडी आणि पश्चिम आशिया भागात भारतातून सुमारे ३.१ अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन निर्यात झाले, जे भारताच्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीच्या जवळपास १२ टक्के आहेत. त्यामुळे या प्रदेशातील कोणतीही अस्थिरता भारतीय उद्योगांसाठी मोठा धोका ठरू शकते.
जर संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर निर्यातीतील संपूर्ण ३ अब्ज डॉलर्सचे उत्पन्नही धोक्यात येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम पुढील तिमाहीत आणि पुढील आर्थिक वर्षातही दिसू शकतो. दरम्यान, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही कंपन्या पर्यायी बाजारपेठांकडे वळण्याचा विचार करत आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीन, जपान, जर्मनी, नेदरलँड्स आणि मेक्सिको यांसारख्या देशांमध्ये निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
गेल्या दशकात भारताने मोबाइल उत्पादनात मोठी झेप घेतली आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यात देशाच्या प्रमुख निर्यात क्षेत्रांपैकी एक बनली आहे. मात्र पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कायम राहिला, तर या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राला तात्पुरता धक्का बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर परिस्थिती लवकर स्थिर झाली, तर भारतीय मोबाइल निर्यात पुन्हा वेगाने वाढू शकते; पण संघर्ष वाढल्यास इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.







