सहारा गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आली आहे. लवकरच या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. यासाठी मंगळवारी, १८ जुलै रोजी सहारा रिफंड पोर्टल दाखल करेल. सहारा समूहाच्या चार सहकारी समित्यांचा गुंतवणूकदारांना दावा केलेली रक्कम मिळण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे पोर्टल दाखल करणार आहेत.
सहारा समूहाच्या चार सहकारी समित्यांमधील १० कोटी गुंतवणूकदारांचे पैसे नऊ महिन्यांत परत केले जातील, असे केंद्र सरकारने २९ मार्च रोजी जाहीर केले होते. सहारा- सेबी रिफंड खात्यातून पाच हजार कोटी रुपये केंद्रीय सहकारी समिती रजिस्ट्रारकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी गुंतवलेली रक्कम दिली जाणार आहे.
हे ही वाचा:
जगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची
वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान
भारत इंडोनेशियात आता डिजिटल तंत्रज्ञान व्यवहार
नोव्हाक जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणत कार्लोस अल्कराझ विम्बल्डन विजेता
सहारा क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी, सहारायन युनिव्हर्सल सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी सहारा कंपनीच्या समित्यांची नावे आहेत. या सहकारी समित्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी सहकार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पाच हजार कोटी रुपये सीआरएसला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते.







