देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे आणि कुठेही इंधनाची कमतरता नाही.
भारत पेट्रोलियमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. कंपनीने सांगितले की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू आहे.
बीपीसीएलने हेही स्पष्ट केले की, भारत पेट्रोल आणि डिझेलचा नेट एक्सपोर्टर आहे आणि कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल तसेच एव्हिएशन टर्बाइन फ्यूल यांचेही पुरेसे साठे उपलब्ध आहेत. कंपनीने नागरिकांना घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचे आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. तसेच अखंडित इंधन पुरवठ्यासाठी कंपनी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे सांगितले.
याचप्रमाणे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशननेही आपल्या निवेदनात सांगितले की, देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. ग्राहकांनी अफवांपासून दूर राहून नेहमीप्रमाणे इंधनाचा वापर सुरू ठेवावा, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे संपूर्ण नेटवर्क सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
तिरंगाधारी सहा एलपीजी टँकर येतायत भारतात
“अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करतेय”
कोरडा खोकला होतोय? जाणून घ्या सोपे उपाय
MGL कडून नवीन गॅस कनेक्शन मोफत आणि अखंड पुरवठ्याची हमी
दरम्यान, सरकारनेही परिस्थिती स्पष्ट करत सांगितले की देशातील सर्व रिफायनऱ्या उच्च क्षमतेने कार्यरत आहेत आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की देशात १८७०० टन व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा करण्यात आला असून १ लाखांहून अधिक पेट्रोल पंप नियमितपणे कार्यरत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की पीएनजी कनेक्शनचा विस्तार वेगाने होत असून एका दिवसातच ७५०० नवीन घरगुती आणि व्यावसायिक कनेक्शन देण्यात आले आहेत. एलपीजी पुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी सरकार सतत नवीन स्रोतांवर काम करत आहे.
सरकारने हेही सांगितले की एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कठोर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ६४२ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून १५५ जणांना अटक करण्यात आली आहे. मागील २४ तासांत सुमारे ३४०० ठिकाणी छापे टाकून जवळपास १००० सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील सर्व रिटेल आउटलेट्स सामान्यपणे सुरू असून इंधन पुरवठा पूर्णपणे स्थिर आहे.







