सलग चार दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी अखेर दिलासादायक पुनरागमन केले. जागतिक तणाव, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि रुपयातील ऐतिहासिक घसरण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही बाजाराने दिवसअखेर सकारात्मक बंद दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या चिंतेत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले.
बीएसई सेन्सेक्समध्ये दिवसभर चढ-उतार सुरू होते. सकाळी सकारात्मक वातावरणात व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजाराने चांगली उसळी घेतली. अखेरीस सेन्सेक्स तब्बल ४९ अंकांच्या वाढीसह ७४ हजार ६०९ वर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांक ३३ अंकांनी वाढून २३ हजार ४१३ या पातळीवर स्थिरावला. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराने हिरव्या निशाणावर बंद दिल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.
हे ही वाचा:
मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!
पाकिस्तानवरच्या विजयानंतर बांगलादेशी खेळाडूंना फायदा
बीएफआयच्या नव्या निवड नियमांवर बॉक्सर मनोज कुमार यांचे प्रश्नचिन्ह
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ
दिवसभर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्सने सुमारे ३०० अंकांची झेप घेतली होती. मात्र दुपारनंतर रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९५ रुपये ८० पैशांचा विक्रमी नीचांक गाठताच बाजारात पुन्हा विक्रीचा दबाव वाढला. रुपयातील घसरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले होते.
यावेळी धातू आणि कमोडिटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली. केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हिंदुस्तान झिंक, वेदांता आणि इतर धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसली. मेटल निर्देशांकात जवळपास ३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवर दबाव कायम राहिला. पश्चिम आशियातील वाढलेला तणाव, अमेरिकेतील महागाईची चिंता आणि वाढणारे कच्च्या तेलाचे दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून विक्री सुरूच ठेवली आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिरता कायम असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, मागील सत्रात सेन्सेक्स तब्बल १ हजार ४५६ अंकांनी कोसळला होता. त्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बुधवारी दिसलेली तेजी ही बाजारासाठी मानसिक आधार देणारी मानली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात शेअर बाजाराची दिशा प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किंमती, इराण-अमेरिका तणाव, रुपयाची स्थिती आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर अवलंबून राहणार आहे. सध्या बाजारात मोठी अस्थिरता असल्याने सामान्य गुंतवणूकदारांनी संयमाने आणि सावधपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.
