प्रशांत कारुळकर
मी अनेक व्यक्तींना भेटतो, त्यांच्या कामाचे बारकावे पाहतो. पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांच्या कामाचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. कामाच्या चौकटी ओलांडून पुढे जाण्याची त्यांची तयारी असते. नाबार्डचे (NABARD) अध्यक्ष, शाजी के. व्ही. हे अशाच व्यक्तींपैकी एक. त्यांच्या कामाचा थेट संबंध भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी, शेतकरी बांधवांशी आणि पर्यायाने देशाच्या विकासाशी आहे. थोडक्यात आपल्या देशाच्या अर्थकारणाचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राशी ते संबंधित आहेत.
शाजी के. व्ही. यांचा प्रवास म्हणजे ग्रामीण भारताच्या विकासाची एक छोटीशी कथा आहे. त्यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम येथला. कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. शिवाय IIM अहमदाबादमधून पब्लिक पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) केले आहे. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे कृषी क्षेत्रातील बारकावे, समस्या आणि त्यावरील आर्थिक व धोरणात्मक उपाययोजनांची सखोल जाण त्यांना आहे.

सिंडिकेट बँकेतून त्यांनी करिअरची सुरुवात केली. पुढे ही बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. कॅनरा बँकेत त्यांनी २६ वर्षे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. तेथे त्यांनी ग्रामीण बँकिंग आणि अर्थव्यवस्थेची नाडी ओळखली. कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख असताना, प्रशासकीय दूरदृष्टी आणि नियोजन कौशल्याचा पुरेपुर वापर करत त्यांनी सिंडिकेट बँकेचे यशस्वी विलीनीकरण पार पाडले.
२०१३ ते २०१७ या काळात ते केरळ ग्रामीण बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ही बँक देशातील सर्वात मोठी प्रादेशिक ग्रामीण बँक होती. ग्रामीण बँकांचे महत्त्व ओळखून त्यांनी या बँकांना अधिक सक्षम बनवण्याचे काम केले. २०२० मध्ये ते नाबार्डमध्ये उप-व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले आणि ७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या अध्यक्षपदाखाली नाबार्डने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. त्यांची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे पारंपरिक कृषी वित्त पुरवठ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे. आजचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि शेतीही त्याला अपवाद नाही. शाजी के. व्ही. यांच्या नेतृत्वाखाली नाबार्डने कृषी-फिनटेक या संकल्पनेला खूप महत्त्व दिले आहे. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी ‘ऍग्री-फिनटेक: फार्म-टू-टेबल फायनान्सिंगसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर केलेले भाषण त्यांच्या गाढ्या व्यासंगाची साक्ष देणारे आहे.
कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती आणण्याचे ध्येय त्यांनी कायम डोळ्यासमोर ठेवले. प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांच्या (PACS) संगणकीकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योजना तयार केली आहे, ज्यामुळे येत्या काळात सुमारे ६३,००० PACS डिजिटल होतील. यामुळे व्यवहारांमध्ये गती येईल, पारदर्शकता वाढेल आणि ग्रामीण भागधारकांना बँकिंग सेवांचा लाभ घेणे सोपे होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली नाबार्डने हवामान बदलाशी संबंधित उपक्रमांवरही लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारित पीक नियोजन, कृषी क्षेत्रात कार्बन क्रेडिट्स निर्माण करणे आणि हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यांसारख्या अनेक उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील महिला बचत गटांना (SHGs) आर्थिक साहाय्य देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे कामही ते करत आहेत. त्यांच्यामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे.
शाजी के. व्ही. यांचे काम फक्त एका बँकेच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित नाही. त्यांना ग्रामीण भारताची खरी ताकद माहित आहे. ते केवळ आकडेवारी आणि धोरणे पाहत नाहीत, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे स्वप्न पाहतात. मी उद्योजक असलो तरी माझे मूळचे कुटुंब शेतकरी. मी ही शेतकरी आहे. आजही डहाणूमध्ये आमची शेतजमीन आहे. त्यामुळे शाजी यांच्या कामाचे महत्व आणि आवश्यकता मी समजू शकतो. केवळ एक उद्योजक म्हणून नाही तर शेतकरी म्हणूनही मला त्यांच्या कामातून प्रेरणा मिळते. कोणताही व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र यशस्वी करायचे असेल, तर केवळ आर्थिक नफा नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात बदल घडवणे हेच खरे यश असते. हे शाजी यांच्या कामाचे सूत्र आहे. हेच त्यांचे वेगळेपण आहे. नाबार्डच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या सारख्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कृषी क्षेत्र आधुनिकतेकडे आणि आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.







