अवघ्या ३ महिन्यांत भारतीयांनी विकले तब्बल ५० टन जुने सोने!

सोन्यावरचा विश्वास ढळला?

अवघ्या ३ महिन्यांत भारतीयांनी विकले तब्बल ५० टन जुने सोने!

भारतीयांसाठी सोने म्हणजे केवळ दागिना किंवा गुंतवणूक नव्हे, तर पिढ्यानपिढ्या जपलेली आर्थिक सुरक्षितता मानली जाते. मात्र आता हाच पारंपरिक दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत देशभरातील नागरिकांनी तब्बल ५० टन जुने सोने विकले असून, या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता त्या आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अनेकांनी नफा सुरक्षित करण्यासाठी घरात पडून असलेले जुने दागिने, नाणी आणि सोन्याच्या विटा विकण्यास सुरुवात केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, काही महिन्यांपूर्वी प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १.८० लाख रुपयांपर्यंत गेला होता. त्यानंतर किमतींमध्ये घसरण सुरू झाली असून, आगामी काळात भाव आणखी खाली येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी किंमती आणखी घसरण्यापूर्वीच सोने विकून नफा मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः ज्यांच्याकडे अनेक वर्षांपासून वापरात नसलेले दागिने होते, त्यांनी ही संधी साधत मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे.
हे ही वाचा:
सोन्याची चमक फिकी, चांदीचीही मोठी घसरण!

अहिर शिंदेंकडे आले, आदित्य ठाकरेंचा पराभव निश्चित

दहशतवादी संघटनांसाठी स्थानिक नेटवर्क म्हणून काम करणारा हाजी लतीफ जेरबंद

जून महिन्यात मंदावलेला मान्सून वेग धरणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

यामुळे देशभरातील जुने सोने खरेदी करणाऱ्या ज्वेलर्स आणि गोल्ड रिसायकलिंग कंपन्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी जुन्या सोन्याच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले आहे. ग्राहकांकडून विकत घेतलेले हे सोने शुद्ध करून पुन्हा नव्या दागिन्यांच्या निर्मितीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे गोल्ड रिसायकलिंग उद्योगालाही मोठी चालना मिळत असून, भारताच्या सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीही हा ट्रेंड महत्त्वाचा ठरू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, हा बदल केवळ किंमतीतील चढ-उतारामुळे झालेला नाही, तर भारतीयांच्या गुंतवणुकीच्या मानसिकतेतही मोठा बदल होत असल्याचे तो दर्शवतो. पूर्वी कोणत्याही परिस्थितीत सोने न विकणारी कुटुंबे आता बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करून योग्य वेळी नफा बुक करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोने ही केवळ भावनिक संपत्ती न राहता, योग्य वेळी आर्थिक फायदा मिळवून देणारी मालमत्ता म्हणूनही पाहिली जात आहे.

येत्या काही महिन्यांत जागतिक आर्थिक घडामोडी, व्याजदरांतील बदल, डॉलरची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी यावर सोन्याच्या किमती अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे किंमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता कायम असल्याने, जुन्या सोन्याची विक्री आणि गोल्ड रिसायकलिंगचा वेग पुढील काळातही वाढू शकतो. भारतीय ग्राहकांचा हा बदलता कल देशातील सोन्याच्या बाजारासाठी महत्त्वाचा संकेत मानला जात असून, पारंपरिक गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Exit mobile version